शिंदे गटातील आशिष जयस्वालांविरोधात भाजपमधून बंडाचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 07:50 PM2022-07-09T19:50:11+5:302022-07-09T19:51:33+5:30

Nagpur News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले व मूळचे शिवसैनिक असलेले रामटेकचे अपक्ष आ. आशिष जयस्वाल यांच्या विरोधात भाजपमधूनच बंडाचा झेंडा उभारण्यात आला आहे.

BJP rebels against Ashish Jaiswal of Shinde group | शिंदे गटातील आशिष जयस्वालांविरोधात भाजपमधून बंडाचा झेंडा

शिंदे गटातील आशिष जयस्वालांविरोधात भाजपमधून बंडाचा झेंडा

googlenewsNext
ठळक मुद्देभ्रष्टाचारी व्यक्तीला मंत्री करू नका मालमत्तांची ईडी- सीबीआयमार्फत चौकशीची मागणी

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले व मूळचे शिवसैनिक असलेले रामटेकचे अपक्ष आ. आशिष जयस्वाल यांच्या विरोधात भाजपमधूनच बंडाचा झेंडा उभारण्यात आला आहे. भाजपच्या नागपूर जिल्हा ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत जयस्वाल यांच्या भ्रष्टाचाराची, तसेच त्यांच्यासह नातेवाईक व निकटवर्तीयांच्या संपत्तीची ईडी-सीबीआयमार्फत चौकशी करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नये, अशी मागणी केली.

राजेश ठाकरे म्हणाले, आ. जयस्वाल हे खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी रॉयल्टीच्या नावावर खनिज संपदेची लूट केली. रेती, मुरमाची विक्री केली. शेतातून मातीमिश्रित रेती काढण्याच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी सूर नदीलगतच्या जमिनी नातेवाईक व निकटवर्तीयांच्या नावावर खरेदी केल्या. येथून रेती काढून सरकारचा १५० कोटींचा महसूल बुडविला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खनिकर्म मंडळात ३०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याची चौकशीही सुरू झाली. मात्र, जयस्वाल यांनी आपले मुख्यमंत्र्यांजवळील वजन वापरून चौकशी थांबवली. ती चौकशी पुन्हा सुरू करण्याची मागणी ठाकरे यांनी केली आहे.

आ. जयस्वाल यांनी मॅक्सवर्थ या कंपनीशी हातमिळवणी करून रामटेक-पारशिवनी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या. पुढे यातील काही जमिनी त्यांचे बंधू अनिल जयस्वाल यांनी संबंधित कंपनीकडून खरेदी केल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला. धान खरेदी केंद्रातही जयस्वाल यांचा मोठा वाटा आहे. छत्तीसगड व मध्यप्रदेशातून धान बोलावून तो येथे विकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

मोदी, शहा, फडणवीसांकडे तक्रार करणार

- आपण भाजपचे जबाबदार पदाधिकारी आहोत. या सरकारमध्ये डाग नसलेले मंत्री करू, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आ. जयस्वाल यांना मंत्री करू नका, अशी मागणी करणारे मेल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: BJP rebels against Ashish Jaiswal of Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.