भाजपकडून बावनकुळेंचे पुनर्वसन की कुकरेजांना संधी? काँग्रेसची भिस्त मुळकांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 07:32 PM2021-11-09T19:32:02+5:302021-11-09T19:32:30+5:30
Nagpur News गडकरी-फडणवीस यांची राज्यात मान उंचावण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपला ही निवडणूक जिंकणे आवश्यक आहे तर गटबाजी विसरून एकत्र येत पदवीधरच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याची काँग्रेस नेत्यांना संधी आहे.
नागपूर : नागपूर महापालिका व काही नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या तोंडावर १० डिसेंबरला नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. संख्याबळानुसार भाजपचे पारडे जड आहे. मात्र, पदवीधर निवडणुकीत गटबाजीतून झालेला पराभव व जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसने घेतलेल्या मुसंडीमुळे भाजपचे मनोबल खचले आहे. त्यामुळे गडकरी-फडणवीस यांची राज्यात मान उंचावण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपला ही निवडणूक जिंकणे आवश्यक आहे तर गटबाजी विसरून एकत्र येत पदवीधरच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याची काँग्रेस नेत्यांना संधी आहे.
आता या संधीचे सोनं नेमके कोण करतो यावर भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने अशोकसिंह चव्हाण यांची तर भाजपने गिरीश व्यास यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुंबईची जागा काँग्रेसचे भाई जगताप तर नागपूरची जागा भाजपचे गिरीश व्यास यांच्यासाठी सोडण्याची तडजोड दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झाली. त्यामुळे अशोकसिंह चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला व गिरीश व्यास अविरोध विजयी झाले होते.
यावेळी मात्र निवडणूक अविरोध होण्याची शक्यता नाही.
भाजपकडे संख्याबळ ३२५ वर
- या निवडणुकीत सुमारे ५५७ मतदार आहेत. भाजपकडे स्वत:चे ३१४ व बरिएमंचे २ असे एकूण ३१६ सदस्य आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादी, शिवसेना, बसपसह सर्व अपक्षांना एकत्र केले तरी मॅजिक फिगर गाठणे कठीण आहे. भाजपमध्ये मोठी फूट पडली किंवा पाडू शकले तरच काँग्रेसला संधी आहे.
भाजपकडून बावनकुळे की कुकरेजा ?
भाजपकडून माजी मंत्री व प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व नगरसेवक विक्की कुकरेजा यांची नावे चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी ‘हायकमांड’च्या आदेशावरून बावनकुळे यांचे कामठीतील तिकीट कापण्यात आलो होते. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी देण्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही बावनकुळे पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात आघाडीवर राहिले. त्यामुळे यावेळी ‘हायकमांड’ त्यांच्याबाबत काय भूमिका घेते यावर सर्व काही अवलंबून आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले नगरसेवक विक्की कुकरेजा यांचेही नाव फडणवीस गटाकडून पुढे केले जात आहे. ते सर्वच बाबींनी ‘सक्षम’ आहेत. फडणवीस ब्रिगेडमधील परिणय फुके, प्रवीण दटके, संदीप जोशी आटोपले. त्यामुळे आता कुकरेजा यांना संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपचा उमेदवार गडकरी की फडणवीस गटाचा ?
- संख्याबळाचा विचार करता भाजपला ही निवडणूक जिंकणे फारसे कठीण नाही. मात्र, पदवीधर निवडणुकीत गटबाजीमुळे बसलेला फटका पाहता भाजपलाही ताक फुंकून प्यावे लागणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक असलेले माजी आ. अनिल सोले यांचे तिकीट कापून फडणवीस यांचे जीवलग असलेले माजी महापौर संदीप जोशी यांना पदवीधरचे तिकीट देण्यात आले होते. त्यामुळे गडकरी गट कमालीचा दुखावला. कुणी उघडपणे नाराजी बोलून दाखविली नाही पण निकालानंतर मात्र ती दिसली. ५७ वर्षांनंतर भाजपला ही जागा गमवावी लागली. आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. अशात गटबाजीतून ही जागा गमावणे गडकरी-फडणवीस यांना परवडणारे नाही. त्यामुळे एखादवेळी फडणवीस हे दोन पावले मागे घेत गडकरींनी सुचविलेल्या उमेदवाराला रिंगणात उतरवतील, अशी शक्यता आहे.