साई मंदिरावर भाजपचे गुलाब फुलले

By admin | Published: January 4, 2016 05:04 AM2016-01-04T05:04:11+5:302016-01-04T05:04:11+5:30

वर्धा मार्गावरील साई मंदिराचा कारभार बघण्यासाठी गठित करण्यात आलेल्या श्री साईबाबा सेवा मंडळाच्या विश्वस्त

The BJP rose on the Sai temple | साई मंदिरावर भाजपचे गुलाब फुलले

साई मंदिरावर भाजपचे गुलाब फुलले

Next

नागपूर : वर्धा मार्गावरील साई मंदिराचा कारभार बघण्यासाठी गठित करण्यात आलेल्या श्री साईबाबा सेवा मंडळाच्या विश्वस्त पदासाठी रविवारी पार पडलेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांच्या गुलाब पॅनलने सर्व ११ जागावर विजय मिळविला आहे.
निवडणुकीत श्री साई भक्त -साई सेवक, गुलाब तसेच बाबासाहेब उत्तरवार अशा प्रमुख तीन पॅनलसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने विश्वस्तपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात मतदानानंतर मतमोजणी करण्यात आली. विश्वस्त मंडळाच्या ११ सदस्यांपैकी भोयर यांच्या पॅनलचे संरक्षक सदस्य गटातून प्रभाकर मुंडले तर आजीवन सदस्य गटातून राजेंद्र दांडेकर व प्रताप रणनवरे हे आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. साधारण गटातील आठ सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले. तीन पॅनलचे उमेदवार व पाच अपक्ष असे २४ साईभक्त निवडणुकीच्या मैदानात होते. परंतु सर्व आठ जागावर भोयर यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, अनिवाश शेगांवकर (३५०), नगरसेवक डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर (४१०), मुन्ना यादव (३५८), कैलास जोगानी (३६४), घनश्याम राठी (३४५), राजेन्द्र देशमुख (३४८), सुधीर दफ्तरी (३४५) व महेश टेंभरे (३४५ ) आदींचा समावेश आहे. ६८१ मतदारापैकी ६२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९३ टक्के मतदान झाले.
यातील ६ मते अवैध ठरली. धर्मादाय आयुक्त मंगला कांबळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
साई मंदिरावरील सत्तेसाठी सर्वच पॅनलने आपली शक्ती पणाला लावली होती. मंदिराची सुरक्षा, आर्थिक व्यवहारात पारदर्शता व भ्रष्टाचाराला विरोध आणि विकास अशा मुद्यावर ही निवडणूक लढवण्यात आली. (प्रतिनिधी)

संघटितपणाचा विजय
संघटितपणे निवडणुकीला सामोरे गेल्याने आमच्या पॅनलचा विजय झाला. साई मंदिर देवस्थानला विदर्भातील एक अग्रणी देवस्थान बनविण्याचा संकल्प आहे. येथे पार्किंग सुविधा व इतर आवश्यक विकास कामे करण्याचा प्रयत्न राहील. ७ जानेवारी पूर्वी कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
-छोटू भोयर

Web Title: The BJP rose on the Sai temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.