सना खान हत्या प्रकरण : अमित साहूच्या नार्को चाचणीचा अर्ज फेटाळला
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: September 1, 2023 04:54 PM2023-09-01T16:54:09+5:302023-09-01T16:55:01+5:30
जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय
नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला अमित उर्फ पप्पू साहू याची नार्को चाचणी करण्याची परवानगी मिळविण्यासाठी मानकापूर पोलिसांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला अर्ज शुक्रवारी फेटाळण्यात आला. न्या. व्ही. व्ही. देशमुख यांनी हा निर्णय दिला.
सना यांची २ ऑगस्ट रोजी हत्या करून मृतदेह मध्य प्रदेशातील हिरन नदीत फेकून दिला, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. परंतु, पोलिसांना अद्याप सनाचा मृतदेह मिळून आला नाही. त्यामुळे सनाची हत्या झाली की नाही, हत्या झाली तर, तिचा मृतदेह कोठे आहे, हत्या झाली नसेल तर, आरोपींनी सनाला कोठे लपवून ठेवले इत्यादी प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आरोपी हे पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे पोलिसांनी साहूची नार्को चाचणी करण्याची परवानगी मागितली होती. परंतु, न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता त्यांना ही परवागी देण्यास नकार दिला.