सना खान हत्या प्रकरण : म. प्रदेशचे आ. संजय शर्मा यांची दोन तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:28 AM2023-08-25T11:28:01+5:302023-08-25T11:28:26+5:30
आरोपींसमोर बसवून आमदाराची चौकशी : आईची आगपाखड
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्येच्या प्रकरणात चौकशीसाठी अखेर मध्य प्रदेशच्या तेंदुखेडा येथील काँग्रेसचे आमदार संजय शर्मा हे नागपुरात पोहोचले. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात त्यांची दोन तास चौकशी झाली. चौकशीनंतर त्यांनी या प्रकरणाशी माझे काहीच देणेघेणे नसल्याचा दावा केला. पोलिसांनी आरोपी अमित साहूला समोर बसवून शर्मा यांची चौकशी केली, हे विशेष. दरम्यान, चौकशी सुरू असताना सना खानच्या आई मेहरुन्निसा या कार्यालयात पोहोचल्या व त्यांनी मृतदेह सापडत नसल्याच्या मुद्द्यावरून आगपाखड केली.
सना खान हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी व जबलपूर येथील कुख्यात गुन्हेगार अमित उर्फ पप्पू साहू आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित साहूसह धर्मेंद्र यादव नावाच्या गुन्हेगाराला व त्याचा पिता वाळूमाफिया रब्बू यादव या दोघांना अटक करण्यात आली होती. धर्मेंद्रचा उजवा हात कमलेश पटेलने रब्बूसोबत सना यांचे मोबाइल फोन नष्ट केले होते. सना खान यांच्या आईने यात राजकीय लिंक असल्याचा आरोप केला होता.
पोलिसांनी चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून अगोदर भाजपमध्ये असलेले व नंतर कॉँग्रेसमध्ये गेलेले आ. संजय शर्मा यांना चौकशीसाठी बोलविले होते. बुधवारऐवजी शर्मा गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास चौकशीसाठी पोहोचले. त्यानंतर दोन तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी चालली. चौकशी सुरू असतानाच आरोपी अमित साहूला कडेकोट बंदोबस्तात तेथे आणण्यात आले. त्याला शर्मा यांच्यासमोर बसवून चौकशी करण्यात आली. त्याने शर्मा यांच्याशी काहीच लिंक नसल्याचा दावा केला, तर शर्मा यांनीदेखील या प्रकरणाशी काहीच देणेघेणे नसल्याचे पोलिसांना सांगितले. सना खान यांचा मृतदेह शोधण्यात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी शर्मा यांनी दिले.
हत्येनंतर अमितने घेतली होती शर्मांची भेट
चौकशी संपताच संजय शर्मा मध्य प्रदेशकडे रवाना झाले. सना खान हत्याकांडाशी माझा कुठलाही संबंध नाही. या प्रकरणाची मला काहीही माहिती नाही. पोलिसांनी मला चौकशीसाठी का बोलावले आहे, याची मला कल्पना नाही. मात्र, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली. पोलिसांना योग्य ते सहकार्य केले. अमित १५ वर्षांअगोदर काम करत होता. त्यामुळे त्याला ओळखत होतो. या प्रकरणाशी माझे काहीही घेणेदेणे नाही. अमित साहू काम सोडल्यानंतर भेटला नव्हता. मात्र, ही घटना झाल्यावर तो मला एकदा येऊन भेटला होता. सना खानला मी कधीही भेटलो नव्हतो. रविशंकर यादव हा ठेकेदार असून, त्याला मी ओळखतो, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
आवश्यकता वाटल्यास परत चौकशी
संजय शर्मा यांना सना खान हत्याकांड प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून, आवश्यकता वाटल्यास त्यांना परत चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी स्पष्ट केले.
माझ्या मुलीचा मृतदेह शोधून द्या
चौकशी सुरू असताना मेहरुन्निसा खान या कार्यालयात पोहोचल्या. अगोदर त्या कार्यालयाच्या दरवाजासमोर उभ्या राहूनच संताप व्यक्त करू लागल्या. अखेर पोलिस कर्मचारी त्यांना अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर नाहक चिखलफेक केली जात आहे. मी माझी मुलगी गमावली आहे. २३ दिवसांनंतरही तिचा मृतदेह का सापडला नाही, असा सवाल त्यांनी विचारला.