एक होती सना... केस झाली इतिहासजमा ?; डीएनए अहवाल अडकलेलाच, चार्जशीटही नाही
By योगेश पांडे | Published: October 18, 2023 11:40 AM2023-10-18T11:40:46+5:302023-10-18T11:41:42+5:30
मृतदेहच न आढळल्याने फॉरेन्सिक पुराव्यांवरच पोलिसांची भिस्त
योगेश पांडे
नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याकांड प्रकरणाला अडीच महिने उलटून गेल्यावरदेखील पोलिसांना मृतदेह हाती लागलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहच न आढळल्याने फॉरेन्सिक पुराव्यांवरच पोलिसांची भिस्त राहणार आहे. मात्र डीएनए चाचणीचे पूर्ण अहवाल पोलिसांना मिळालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी तुरुंगात असले तरी पोलिसांनी या प्रकरणात अद्यापही न्यायालयात आरोपपत्र दाखल करता आलेले नाही. त्याचा फायदा आरोपींना होईल की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२ ऑगस्टला अमित साहूने सना खान यांची त्याच्या जबलपूर येथील निवासस्थानी हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह हिरन नदीत फेकला होता. मात्र, हिरन नदी व नर्मदा नदीला त्यावेळी पूर आला होता. त्यामुळे मृतदेह दूरवर वाहून गेल्याची किंवा गाळात फसल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी युद्धपातळीवर मृतदेहाचा शोध घेतला. पोलिसांनी विविध गावांमध्येदेखील विचारपूस केली व माहिती देणाऱ्यास बक्षीसदेखील जाहीर केले. मात्र, सना यांच्या मृतदेहाबाबत कुठलीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करताना पोलिसांना फॉरेन्सिक पुराव्यांवरच भर द्यावा लागणार आहे.
यासोबतच फॉरेन्सिक तपासादरम्यान अमित साहूचे घर, त्याच्या घराचा सोफा, त्याची कार यावर रक्ताचे डाग मिळाले आहेत. सना यांच्या कुटुंबीयांशी डीएनए मॅच करण्याची प्रक्रिया झाली आहे तसा अहवालही पोलिसांना मिळाला. मात्र, काही डीएनए चाचण्यांचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. याबाबत पोलिसांकडून पाठपुरावा करण्यात येत असला तरी ‘डिरेक्टोरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेटरीज’कडून अहवाल कधी मिळेल याची शाश्वती नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच आरोपपत्र दाखल झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
त्या महिलेची साक्ष ठरणार महत्त्वाची
जबलपूरला गेलेल्या नागपूर पोलिसांच्या पथकाला या प्रकरणातील महत्त्वाची साक्षीदार सापडली होती. आरोपी अमित साहूच्या घराजवळील एका महिलेने हत्येच्या दिवशी तिचा मृतदेह पाहिला होता. यासंदर्भात तिने पोलिसांना बयाण दिले होते. मात्र, न्यायालयासमोर तिचे बयाण दाखल करण्याची प्रक्रिया व्हायची आहे. ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलेला नागपुरात बोलवावे लागणार आहे. त्यादृष्टीनेदेखील संथ पावले उचलण्यात येत आहेत.
अधिकाऱ्यांचा दावा, लवकरच आरोपपत्र दाखल करू
याबाबत परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना विचारणा केली असता त्यांनी आरोपपत्र अद्याप दाखल झाले नसले तरी त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले. लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला. मात्र डीएनए चाचणीचे पूर्ण अहवालच आले नसून पूर्ण प्रक्रियाच झाली नसताना आरोपपत्र कशाचा आधारावर दाखल करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.