मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण न मिळण्याचे संकेत; बावनकुळेंच्या भूमिकेमुळे स्पष्टता
By कमलेश वानखेडे | Published: September 6, 2023 05:34 PM2023-09-06T17:34:15+5:302023-09-06T17:35:10+5:30
फडणवीसांच्या धर्तीवर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे
नागपूर : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला ज्या पद्धतीने वेगळे आरक्षण दिले होते, त्याच पद्धतीने वेगळे आरक्षण द्यायला हवे. दुसऱ्या समाजात आरक्षण देणे योग्य होणार नाही. ओबीसींचे आरक्षण ओबीसींनाच मिळाले पाहिजे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे. सरकार असा कुठलाही निर्णय घेणार नाही की ज्यामुळे दुसरा कुठला समाज नाराज होईल, अशी भूमिका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावरून मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण दिले जाण्याची शक्यता नाही, असे संकेत मिळाले आहेत.
बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, मी भाजपचा प्रदेश अध्यक्ष म्हणून सांगतो की मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. त्यांना वेगळे आरक्षण द्यायला हवे. फडणवीस यांच्या काळात मराठा समाजालाा आरक्षण देत सवलती देण्यासाठी विशेष बजेट मंजूर करण्यात आले होते. त्या पद्धतीने पुन्हा एकदा शिंदे- फडणवीस-पवार सरकार आरक्षण व सवलती देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यावरच त्यांनी भर दिला.
शरद पवार यांनी ४० वर्षे राजकारणात राहून मराठा समाजाचा आर्थिक, सामाजिक मागासलेपणाचा अहवाल तयार केला नाही. आता पवारांच्या जवळचे लोक आंदोलनात सहभागी होऊन दिशाभूल करीत आहेत. सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे. अहवाल येणारच आहे. सरकार विधिमंडळात काय काय घडले ते सांगेल. तेव्हा सर्वकाही समोर येईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. मराठवाडा भागात निजामशाहीच्या काळातील काही प्रमाणपत्रावर कुणबी समाजाचा उल्लेख आहे. त्या आधारावर प्रमाणपत्र दिले जात आहे. हे शोधण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. त्यात सर्वबाबी स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
फडणवीसांनी मोठं मन केले, ठाकरेंनी माफी मागावी
- गृह विभागाच्या अधिकाऱ्याकडून चूक झाली म्हणून मोठं मन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा अधिकारच नाही. त्यावेळी मराठा आरक्षण गेले ते उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रियतेमुळे गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली.