सत्ता वापस मिळविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून खोटारडेपणा, भाजप प्रदेशाध्यक्षांचा आरोप
By योगेश पांडे | Published: April 3, 2023 08:17 PM2023-04-03T20:17:47+5:302023-04-03T20:29:56+5:30
'मोठी खुर्ची भेटणार नाही असे नाना पटोलेंच्या लक्षात आले होते, त्यामुळेच तेदेखील गायब झाले होते.'
नागपूर : राज्य शासनाच्या विकासकामांमुळे महाविकासआघाडीचे लोक बावचळले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत आक्रोश नव्हता तर ढोंगीपणा होता व ती बोंबाबोंब सभा होती. सत्ता वापस मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे व महाविकासआघाडीतील इतर नेते खोटारडेपणा करत आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला. सोमवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
छत्रपती संभाजीनगर येथील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजेशाही थाट व राजेशाही खुर्ची होती. मात्र कॉंग्रेस नेत्यांचे फोटो गायब होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान करण्यात आला. यामुळेच उद्धव ठाकरे बोलायला लागले तेव्हा कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तेथून निघून गेले. मोठी खुर्ची भेटणार नाही असे नाना पटोलेंच्या लक्षात आले होते, त्यामुळेच तेदेखील गायब झाले होते, असे बावनकुळे म्हणाले.
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला होता. याबाबतचा प्रस्ताव मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविला. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणतेही काम केले नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.
उद्धव ठाकरे काय भाजपला संपविणार ?
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आवेशपूर्ण भाषण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून अडीच वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला व हे लोकदेखील जाणतात. बाळासाहेब ठाकरे यांची जागा घेण्यासाठी उद्धव यांना १०० जन्म घ्यावे लागतील, उद्धव ठाकरे भाजपला संपविण्याची भाषा करत आहेत. मात्र त्यांना स्वत:चा पक्ष व आमदार सांभाळता आले नाही. ते भाजपला काय संपविणार असा सवाल बावनकुळे यांनी केला.