ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रस्त्यांवर आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:37+5:302021-09-16T04:12:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाने बुधवारी शहरात जनआक्रोश आंदोलन केले. ...

BJP on the streets for OBC reservation | ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रस्त्यांवर आक्रोश

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रस्त्यांवर आक्रोश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाने बुधवारी शहरात जनआक्रोश आंदोलन केले. याअंतर्गत शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांत आंदोलन करण्यात आले व महाविकास आघाडी शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. ओबीसींच्या या स्थितीसाठी मुख्यमंत्र्यांची हलगर्जीच जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला. रास्ता रोको करणाऱ्या भाजपच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातदेखील घेतले.

जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही तोपर्यंत भाजप आंदोलन करतच राहणार ही भूमिका पक्षाने मांडली आहे. यानुसार राज्यभरातील हजार ठिकाणी बुधवारी आंदोलन पुकारण्यात आले होते. शहरातील सहा प्रमुख चौकांत आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी शासनाचा पुतळा जाळण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला. एक-दोन ठिकाणी यावरून पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये तणावदेखील निर्माण झाला होता.

दक्षिण नागपुरात मानेवाड़ा चौक, मध्य नागपुरात झेंडा चौक, पश्चिम नागपुरात गिट्टीखदान चौक, दक्षिण-पश्चिम नागपुरात संभाजी चौक, उत्तर नागपुरात कांजीहाऊस चौक तर पूर्व नागपुरात झाडे चौकात आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मोहन मते, आ. रामदास आंबटकर, आ. गिरीश व्यास, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, महापौर दयाशंकर तिवारी, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, मिलिंद माने, संजय भेंडे, अर्चना डेहनकर, संदीप जोशी, किशोर पालांदुरकर, देवेन दस्तुरे, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष रमेश चोपडे, अश्विनी जिचकार, भाजयुमो अध्यक्ष पारेंद्र पटले, किशोर वानखेडे प्रामुख्याने सहभागी झाले होते.

Web Title: BJP on the streets for OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.