विरोधी पक्षनेत्यांसाठी भाजपाचा लागतोय कस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:08 AM2021-03-16T04:08:22+5:302021-03-16T04:08:22+5:30
नागपूर : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प वित्त सभापती भारती पाटील मंगळवारी सादर करणार आहेत. पण, यंदा सभागृहात विरोधी पक्षनेत्यांसह उपाध्यक्ष ...
नागपूर : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प वित्त सभापती भारती पाटील मंगळवारी सादर करणार आहेत. पण, यंदा सभागृहात विरोधी पक्षनेत्यांसह उपाध्यक्ष आणि काँग्रेस व राष्ट्रवादीचे गटनेते राहणार नसल्याचे चित्र आहे. कारण या सर्व पदांवरील सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. भाजप विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी दोन दिवसांपासून ऑनलाईन बैठक घेत आहे. पण, विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड करायची, असा प्रश्न भाजपला पडला आहे. कारण बहुतांश सदस्य नवीन असून, त्यांचा अनुभव कमी पडतोय.
सत्ताधारी काँग्रेसच्या गटातून सांगण्यात आले की, कोरोनाकाळात बजेट सभा घेऊन ओपचारिकता पार पाडायची आहे. आम्हाला नियमाप्रमाणे बजेट सादर करून तो कुठल्याही परिस्थितीत मंजूर करायचा आहे. सभागृहात अध्यक्ष आणि बजेट सादर करणाऱ्या सभापती आहेत. त्यामुळे गटनेत्याच्या निवडीची गरज काय? विधानसभेचे अधिवेशन जर अध्यक्षांविना होऊ शकते, तर काही पदाधिकारी नसतील तर काय? फरक पडतो? काँग्रेसच्या गोटात फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. राष्ट्रवादीही त्यांच्या नेत्याच्या निवडीसंदर्भात गंभीर नाही. त्यामुळे मंगळवारी सादर होणारा अर्थसंकल्प विरोधी पक्षनेत्याविना सादर होण्याचे संकेत आहेत.
भाजपच्या काही सदस्यांच्या मते, मंगळवारी सकाळी माजी पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे सदस्यांची बैठक आहे. तिथेच विरोधी पक्षनेता निवडला जाईल. तसे आमचे नोंदणीकृत उपनेता व्यंकट कारेमोरे आहेत. बैठकीत नेत्याची निवड न झाल्यास कारेमोरे हेच जबाबदारी सांभाळतील.