सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात स्थिर सरकार यावे हीच आमची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 10:29 AM2022-06-27T10:29:46+5:302022-06-27T10:36:55+5:30
शिवसेनेतील बंडाळीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसारमाध्यमांसाठी ‘नॉट रिचेबल’ झाले असताना माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
नागपूर : शिवसेनेतील बंडाळीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसारमाध्यमांसाठी ‘नॉट रिचेबल’ झाले असताना माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात स्थिर सरकार यावे हीच आमची अपेक्षा आहे. मात्र सध्याच्या स्थितीत दोन्ही गटांच्या भूमिकेबाबत नेमकी स्पष्टता नाही. त्यामुळे आम्ही ‘वेट ॲंड वॉच’चीच भूमिका घेतली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेच्या दोन गटांमधील संघर्ष कुठल्या दिशेला जाणार याची अद्याप कुणालाही कल्पना नाही. याची स्पष्टता होईल तेव्हा निर्णय घेऊ. आम्हाला कुठलीही घाई नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीला सातत्याने जात असल्याबाबत लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र त्या लोकांना वर्षापती कोण होणार हेच महत्त्वाचे वाटते. देशाच्या राष्ट्रपतीपदी कोण येणार हे महत्त्वाचे नाही का, असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
राज्यात डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा
यावेळी त्यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांना चिमटा काढला. संजय राऊत यांना आम्ही गंभीरतेने घेत नाही. राज्यात सध्या डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा अशी स्थिती आहे. राऊत ते काय बोलतील हे माहिती नसते. अनेकदा ते सांकेतिक भाषेतदेखील बोलतात.
आमदारांना सुरक्षा देणे हे केंद्राचे कर्तव्यच
बंडखोर आमदारांना केंद्राने सुरक्षा दिल्याच्या मुद्यावर राजकारण सुरू आहे. जर एखाद्या आमदाराला धोका असेल तर केंद्र काय राज्य शासनाची प्रतीक्षा थोडी करणार आहे. त्यांच्याकडे गुप्तचर खात्याचा अहवाल असू शकतो. त्यांचे संरक्षण करणे हे कर्तव्यच आहे व त्याचेच पालन होत आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.