भाजयुमोने नागपुरात फाडले उद्धव यांचे पोस्टर्स; नितीन गडकरींचेही टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2023 09:33 PM2023-07-10T21:33:48+5:302023-07-10T21:34:26+5:30

Nagpur News शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपमधून प्रचंड टीका होत आहे.

BJP tore down posters of Uddhav in Nagpur; Nitin Gadkari's criticism too | भाजयुमोने नागपुरात फाडले उद्धव यांचे पोस्टर्स; नितीन गडकरींचेही टीकास्त्र

भाजयुमोने नागपुरात फाडले उद्धव यांचे पोस्टर्स; नितीन गडकरींचेही टीकास्त्र

googlenewsNext

नागपूर : शिवसेनाप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपमधून प्रचंड टीका होत आहे. एरवी राजकीय टीकाटिप्पणीपेक्षा विकासावर भाष्य करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर ठाकरे यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, या शब्दांत गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांचा निषेध केला आहे.

दुसरीकडे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात उद्धव ठाकरे यांचे होर्डिंग्ज फाडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ परिसरात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लागलेले मोठे होर्डिंग्ज फाडत त्यांच्या चेहऱ्याच्या भागाला काळे फासण्यात आले. नागपुरात येऊन उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले व आता उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा अपमान केला आहे. स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही अशा स्थितीत खोटेनाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

दरम्यान, भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून भाजपमध्ये संतापाची लाट असून मंगळवारी सकाळी १० वाजता व्हेरायटी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला सर्व आमदार उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके यांनी दिली.

Web Title: BJP tore down posters of Uddhav in Nagpur; Nitin Gadkari's criticism too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.