उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी, ही महाराष्ट्राची परंपरा नाही - विनोद तावडे
By योगेश पांडे | Published: April 6, 2023 05:46 PM2023-04-06T17:46:25+5:302023-04-06T17:49:04+5:30
भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला व हुकूमशाहीला फुलस्टॉप लावलाय
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ज्या पद्धतीचे वक्तव्य केले आहे ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगळी परंपरा आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका केल्यानंतर आम्ही एका दालनात मतभेद विसरून एकत्र जेवायचो. महाराष्ट्रासारखी राजकीय सौहार्दाची परंपरा उत्तर भारतात पहायला मिळत नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी या परंपरेला छेद दिला आहे, असे प्रतिपादन तावडे यांनी केले. भाजपच्या ४३ व्या स्थापनादिनानिमित्त ते नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
मागील संपुआ सरकारमध्ये वारंवार भ्रष्टाचार झाले. सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोपदेखील झाले. मात्र नऊ वर्षांत एकही आरोप झालेला नाही. भ्रष्टाचारविरहीत सत्ता देता येते हे भाजपने सिद्ध केले आहे. भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला व त्यातून उद्भवणाऱ्या हुकूमशाहीला पुर्णविराम लावला आहे. भाजप सत्तेसाठी नाही तर सत्ता ही समाजपरिवर्तनाचे साधन आहे या उद्दीष्टाने काम करत आहे. हे काम गतीने होण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता झोकून देऊन योगदान देत आहे. मागील नऊ वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. मात्र तरीदेखील विरोधक सांप्रदायिकता व घराणेशाहीच्या आधारावर भाजपला विरोध करत आहेत, असे तावडे म्हणाले.