भाजपलाच मतदारांचा कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:04 AM2018-07-25T00:04:32+5:302018-07-25T00:06:24+5:30
वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. पारशिवनीत शिवसेनेच्या प्रमिला कुंभलकर या विजयी झाल्या. तरीही बहुमत हे भाजपकडे आहे. वानाडोंगरीत भाजपने एकतर्फी २१ पैकी १९ जागांवर कब्जा मिळवित सर्वात मोठा पक्ष बनला. वानाडोंगरीच्या नगराध्यक्षपदावर भाजपच्या वर्षा शहाकार यांनी बाजी मारली. तेथे राष्ट्रवादी आणि अपक्षाला प्रत्येकी एक - एक जागा पदरात पाडून घेता आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. पारशिवनीत शिवसेनेच्या प्रमिला कुंभलकर या विजयी झाल्या. तरीही बहुमत हे भाजपकडे आहे. वानाडोंगरीत भाजपने एकतर्फी २१ पैकी १९ जागांवर कब्जा मिळवित सर्वात मोठा पक्ष बनला. वानाडोंगरीच्या नगराध्यक्षपदावर भाजपच्या वर्षा शहाकार यांनी बाजी मारली. तेथे राष्ट्रवादी आणि अपक्षाला प्रत्येकी एक - एक जागा पदरात पाडून घेता आली.
ग्रामपंचायतला दर्जावाढ मिळाल्यानंतर दोन्ही ठिकाणी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. त्यामुळे सर्वच पक्षांनी दंड थोपटले होते. भाजप आणि शिवसेनेने दोन्ही ठिकाणी स्वत:चे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. असे असताना पारशिवनीत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला. भाजपने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळविला असला तरी तेथे नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणता आला नाही. शिवसेनेच्या प्रमिला कुंभलकर यांनी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या मार्गातून मार्ग काढत विजय सोपा केला. पारशिवनीत शिवसेनेला चार तर काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
वानाडोंगरी नगर परिषदेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होता. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाली. २१ पैकी १९ जागांसह नगराध्यक्षपदावर भाजपच्या उमेदवाराची वर्णी लागली. राष्ट्रवादीकाँग्रेसच्या केवळ एकाच उमेदवाराला विजय मिळविता आला. एका अपक्षानेही वानाडोंगरी नगर परिषदेत खाते उघडले. वानाडोंगरी नगर परिषदेची निवडणूक ही सुरुवातीपासूनच रंगतदार ठरली. १५ जुलैऐवजी १९ जुलैला मतदान झाले. त्यानंतर इव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) बदलविण्यात आल्याचा आरोप करीत ५ बूथवरील मतदान प्रक्रिया थांबविण्यात येऊन चार दिवसांनी तेथे मतदान घेण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीपासून आलेल्या अडचणीमुळे लांबत गेलेली निवडणूक प्रक्रिया अखेर पार पडली आणि निकालही जाहीर झाला. त्यामुळे तेथील उमेदवारांसह मतदारांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला.
एकूण जागा ३८
भाजप ३०
शिवसेना ०४
काँग्रेस ०२
राष्ट्रवादी ०१
अपक्ष ०१
पारशिवनी नगर पंचायत
नगराध्यक्ष : प्रमिला कुंभलकर (शिवसेना)
एकूण जागा १७
भाजप ११
शिवसेना ०४
काँग्रेस ०२
वानाडोंगरी नगर परिषद
नगराध्यक्ष : वर्षा शहाकार (भाजप)
एकूण जागा २१
भाजप १९
राष्ट्रवादीकाँग्रेस ०१
अपक्ष ०१