भाजपा महाराष्ट्रात निवडून येणार
By admin | Published: February 22, 2017 02:48 AM2017-02-22T02:48:03+5:302017-02-22T02:48:03+5:30
निरंतर विकास हा भाजपाचा ध्यास आहे. ५० वर्षांच्या तुलनेत भाजपाने अडीच वर्षांतच विकास करून दाखविला आहे.
नितीन गडकरी : मतदानाने लोकशाही मजबूत होणार
नागपूर : निरंतर विकास हा भाजपाचा ध्यास आहे. ५० वर्षांच्या तुलनेत भाजपाने अडीच वर्षांतच विकास करून दाखविला आहे. विकास कामांमुळे भाजपा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात निवडून येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
गडकरी यांनी कुटुंबीयांसोबत महाल येथील मनपा टाऊन हॉल येथे सकाळी मतदान केले.
मतदानानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपुरात भाजपा १०० पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी जात, पंथ, धर्म सोडून मतदान करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
नवीन मतदारांची नोंद
गडकरी म्हणाले, देशाच्या विकासासाठी मतदान करा. त्यामुळे देशात परिवर्तन येईल आणि लोकशाही मजबूत होईल. नागपुरात १.१० लाख नवीन मतदार जुळले आहेत. त्याआधारे प्रत्येक प्रभागात २.५० हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. युवा मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. नवीन मतदारांना शुभेच्छा असून त्यांनी विकासासाठी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
पराजय होईल तिथेही विकास करू
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत गेल्यावेळी ५२ टक्के मतदान झाले होते. यावर्षी ७० टक्के होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूरसह महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांमध्ये भाजपाचे उमेदवार निवडून येतील. निवडणुकीत विजय वा पराभव होत असतो. पण जिथे निवडून येणार नाही, तिथेही विकास कामे करीत राहू. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वात निरंतर विकासाची कामे सुरू आहेत. ही महाराष्ट्रासाठी जमेची बाजू आहे. केंद्र सरकारने विकास कामे करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सकाळीच भाजपा सर्वत्र निवडून येत असल्याचे सांगितले आहे. मतदारांचा कौल मान्य राहील, असे त्यांनी सांगितले.