भाजपाला फेब्रुवारीतील ‘दिवाळी’चे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:43 AM2019-02-14T11:43:11+5:302019-02-14T11:45:21+5:30

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे विविध मोहिमांच्या माध्यमातून अधिकृत प्रचारालाच सुरुवात झाली आहे.

The BJP will lighten lamps in February | भाजपाला फेब्रुवारीतील ‘दिवाळी’चे वेध

भाजपाला फेब्रुवारीतील ‘दिवाळी’चे वेध

Next
ठळक मुद्दे२६ फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन लावणार दिवे कार्यकर्ते ‘इलेक्शन मोड’वर

योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे विविध मोहिमांच्या माध्यमातून अधिकृत प्रचारालाच सुरुवात झाली आहे. पुढील पंधरवड्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. निवडणुकांचे फटाके फुटायला वेळ असला तरी ऐन फेब्रुवारी महिन्यात भाजपाकडून शहरात दिवाळीप्रमाणे ‘बूथ’पातळीवर जाऊन दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. कमल ज्योती संकल्प उत्सवाच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभार्थी असलेल्या लोकांच्या घरात दिवे लावण्यात येणार आहेत. यासंदर्भात पक्षातर्फे मंडळ, ‘बूथ’पातळीवरील पदाधिकाऱ्यांना सूचनादेखील देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मागील दोन वर्षांच्या कालावधीत भाजपाने नागपूरसह महाराष्ट्रात ‘पेजप्रमुख’, ‘बूथप्रमुख’, शक्तीकेंद्रप्रमुख यासारखे उपक्रम राबविले. उपराजधानीत काही ‘बूथ’ वगळता सर्वच ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली व या प्रणालीच्या माध्यमातून जनतेमध्ये जाऊन सरकारी योजनांचा प्रचार-प्रसारदेखील झाला. मात्र आता यापुढे केंद्रपातळीवरुन आलेल्या सूचनांनुसार निवडणुकांच्या तोंडावर जनजागृती करण्यात येणार आहे. यात ‘मेरा परिवार भाजपा परिवार’, महासंपर्क, कमल ज्योती व विजय संकल्प या मोहिमांचा समावेश आहे.
कमल ज्योती मोहिमेवर विशेष भर देण्याच्या सूचना आहेत. याअंतर्गत केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी असलेल्यांच्या घरांमध्ये जाऊन २६ फेब्रुवारी रोजी दिवे लावण्यात येतील. विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी एकत्रित करण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. नागपुरात ‘बूथ’पातळीवरदेखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपरोक्त कार्यक्रमासोबतच प्रत्येक ‘बूथ’वर एका ठराविक वेळी नागरिकांना एकत्रित करुन कमीत कमी पाच दिवे लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘बूथ’मधील पाच कार्यकर्त्यांकडून ‘बाईक’वर जनजागृती
याशिवाय २ मार्च रोजी विधानसभा पातळीवर मोटरसायकल महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक ‘बूथ’मधून पाच कार्यकर्ते ‘बाईक’ चालवतील व जनजागृती करतील.

कार्यकर्त्यांच्या घरांवर झेंडा
दरम्यान १२ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत ह्यमेरा परिवार भाजपा परिवारह्ण ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपाचे कार्यकर्त्यांना घराबाहेर भाजपाचे स्टीकर लावण्याचे व घराच्या छतावर भाजपाचा झेंडा लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अ़नेक भागात याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारपासून या मोहिमेला आणखी गती देण्यात येईल,अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: The BJP will lighten lamps in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा