प्रचारादरम्यान भाजप घेणार इन्फ्लुएन्सर्सची साथ, यादी देखील तयार!
By योगेश पांडे | Published: March 7, 2024 11:58 PM2024-03-07T23:58:29+5:302024-03-07T23:58:46+5:30
‘मिशन २०२४’साठी ‘सोशल मीडिया’वर विशेष भर
नागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे २०२४ चे ‘टार्गेट’ दिसते तेवढे सोपे नसल्याची भाजपच्या नेत्यांना जाणीव आहे. त्यामुळे नवमतदारांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तरुणाईची नेमकी नस पकडत त्यांच्याच पद्धतीने त्यांच्यापर्यंत पक्षाचे मुद्दे पोहोचविण्यासाठी भाजपाकडून प्रचारादरम्यान सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची साथ घेण्यात येणार आहे. पक्षाच्या कामात येऊ शकणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सची यादीदेखील तयार करण्यात आली असून त्यांच्या प्रचाराची दिशा कशी असेल याची ब्ल्युप्रिंटदेखील तयार करण्यात आली आहे.
२०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपने तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला होता. २०१९ मध्ये मतदानवाढ व नवमतदारांशी संपर्क यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. राजकीय पातळीवर भाजपने विधानसभा व लोकसभा मतदारसंघनिहायप्रमुख नेमून अगोदरच नियोजन सुरू केले होते. दुसरीकडे प्रचार-प्रसार धोरणाचीदेखील ‘ब्लू प्रिंट’ तयार झाली आहे.
तरुणाई फेसबुक, ट्विटर यासारख्या ‘प्लॅटफॉर्म्स’पेक्षा ‘इन्स्टाग्राम’सारख्या ‘ॲप्स’वर जास्त सक्रिय असते. भाजपच्या धुरिणांनी हीच बाब हेरून यासारख्या ‘ॲप्स’वर सक्रिय असणाऱ्या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ची यादी बनविली आहे. काही ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ला अधिकृतपणे संपर्क झाला असून त्यांच्यासोबत प्रचाराचे नियोजनदेखील झाले आहे, अशी माहिती पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
एका ‘क्लिक’वर लाखो ‘फॉलोअर्स’पर्यंत संदेश
राजकीय पक्षांकडून पारंपरिक प्रचारावर भर देण्यात येतो. अनेक नेते सोशल मीडियावर सक्रियदेखील आहेत. मात्र ‘इन्फ्ल्युएन्सर्स’चे हजारोपासून लाखोंपर्यंत ‘फॉलोअर्स’ असतात. त्यामुळे त्यांनी टाकलेली एक ‘पोस्ट’ एका क्षणात हजारो-लाखो ‘स्मार्टफोन्स’पर्यंत लगेच पोहोचते. तेथून ‘शेअरिंग’च्या माध्यमातून त्याचा आवाका आणखी वाढतो. आजच्या तरुणाईला त्यांच्याच ‘स्टाइल’ने साद घालण्यासाठी पक्षाकडून ‘सोशल मीडिया’तील ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ची साथ घेण्याचे निश्चित करण्यात आले. प्रचाराचे वेगवान साधन, तरुणाईपर्यंत असलेला संपर्क या बाब लक्षात घेऊनच या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ची चाचपणी करण्यात आली. सरकारने राबविलेल्या योजना, तरुणांसाठीची सरकारची भूमिका या बाबी ‘इन्फ्ल्युएन्सर्स’च्या माध्यमातून नवमतदार व तरुणांसमोर नेण्यात येतील.
कार्यक्रमांत सत्कार देखील
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: सोशल माध्यमांवर सक्रिय असतात. मागील वर्षी जून महिन्यात त्यांनी नागपुरात सोशल माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या व हजारो-लाखोंमध्ये फॉलोअर्स असलेल्या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’शी संवाद साधला होता. यात अगदी १८ वर्षांच्या तरुणापासून ते वरिष्ठांपर्यंतचा समावेश होता. तर नागपुरात झालेल्या भाजयुमोच्या नमो युवा महासंमेलनात राज्यातील पाच इन्फ्लुएन्सर्सचा सत्कार करून भाजपने स्पष्टपणे प्रचाराच्या दिशेचे संकेतच दिले.