भाजप १२५ पेक्षा अधिक जागा जिंकणार
By admin | Published: January 1, 2017 02:55 AM2017-01-01T02:55:54+5:302017-01-01T02:55:54+5:30
नागपूर शहरात ३२ हजार कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत.
नितीन गडकरी : सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे भूमिपूजन
नागपूर : नागपूर शहरात ३२ हजार कोटींच्या विकास कामांचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत. यातील अनेक कामे सुरू झालेली आहेत. नागपूर शहर देशातच नव्हे तर जगात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जाईल. शहराचा चौफैर विकास होत असल्याने महापालिका निवडणुकीत भाजपा १२५ पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ३० मधील बिडीपेठ व आशीर्वाद नगर येथील सिमेंट क्रॉंक्रिट रस्त्यांचे भूमिपूजन व कार्यकर्ता मेळव्यात गडकरी बोलत होते.
व्यासपीठावर भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. प्रा. अनिल सोले, विकास कुंभारे,उपमहापौर सतीश होले,माजी महापौर कल्पना पांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश सिंगारे, रवींद्र भोयर, नगरसेविका निता ठाकरे, रिता मुळे, स्वाती आखतकर, बळवंत जिचकार, संजय ठाकरे, दिव्या घुरडे आदी उपस्थित होते.
शहरातील गरीब लोकांना घरे मिळावी या हेतूने ५० हजार घरे बांधण्याचा उपक्रम राबविला जात आहे. मेट्रो रेल्वे लवकरच धावणार आहे. २४ तास पाणी,दूषित पाण्याचा पुनर्वापर, कचऱ्यापासून वीज निर्मिती, ग्रीन बस अशा प्रकल्पांना सुरुवात झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
नासुप्र बखास्त करु न गेल्या ८१ वर्षापासून होणारी शहरातील नागरिकांची पिळवणूक थांबविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नेतृत्वामुळे झोपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप होत आहे. शहराच्या विकासासाठी महापालिका निवडणुकीत भाजपला निवडून द्या, असे आवाहन सुधाकर कोहळे यांनी केले. यावेळी रमेश सिंगारे, रिता मुळे, स्वाती आखतकर, व रवींद्र भोयर यांच्या कार्यअहवालाचे वाचन करण्यात आले.
अजय बुगेवार, अजय खडतकर, बाजीराव राकस, ईश्वर धांडे, पुरुषोत्तम कुथे, फियाज खान, प्रीती राजदेकर, संगीता बनाफर, मोनिका राय, विलास करांगळे, अभय घोटेकर, प्रशांत कामडी, किशोर पेठे, सूर्यकांत शिरसाट आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)