भाजपा महामेळाव्यातून परतताना भाजपा कार्यकर्त्याचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 11:44 AM2018-04-07T11:44:47+5:302018-04-07T11:44:47+5:30
भाजपाच्या स्थापना दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबई येथे गेलेले प्रभाग ९ चे अध्यक्ष नवनीत बेहरे यांचं शनिवारी रात्री रेल्वेने परतीच्या प्रवासात हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं.
नागपूर : भाजपाच्या स्थापना दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबई येथे गेलेले प्रभाग ९ चे अध्यक्ष नवनीत बेहरे यांचं शनिवारी रात्री रेल्वेने परतीच्या प्रवासात हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. डहाणू येथेच त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी विशेष विमानाने त्यांचे पार्थिव नागपुरात आणण्यात येणार आहे.
बेहरे हे स्थानिक नेत्यांसह विशेष रेल्वेने नागपुरला परत येत होते. रात्री १ च्या सुमारास ही विशेष रेल्वे बांद्रा स्टेशनवरून सुटली. या रेल्वेत आ. डॉ. मिलिंद माने, पदाधिकारी किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, शिवाणी दाणी, रमेश वानखेडे यांच्यासह विविध प्रभागांचे अध्यक्ष, बूथ प्रमुख व कार्यकर्ते होते. रात्री २.३० च्या सुमारास बेहरे यांच्या छातीत जोरात दुखू लागले. ही माहिती मिळताच डॉ. मिलिंद माने यांनी त्यांची त्वरित तपासणी केली. मात्र, बेहरे यांची प्रकृती अधिकच खालावली होती. तपाणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर रेल्वे डहाणू स्टेशनवर थांबविण्यात आली. बेहरे यांचे पार्थिव हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. किशोर पलांदूरकर यांनी घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस करून दिली. मुख्यमंत्र्यांनी लगेच त्याची दखल घेत डहाणू येथील कार्यकर्त्यांना मदतीसाठी पाठविले. सकाळी डहाणू येथे शव विच्छेदन करून पार्थिव मुंबईकडे रवाना करण्यात आले. डॉ. माने हे निवडक पदाधिकाऱ्यांसोबत पार्थिवासोबत मुंबईला रवाना झाले.
बेहरे यांचे पार्थिव नागपुरात नेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष विमानाची व्यवस्था केली असून दुपारनंतर विशेष विमानाने नागपुरात आणले जाईल, असे भाजपातर्फे स्पष्ट करण्यात आले.