भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्याच, आरोपी साहूला अटक
By योगेश पांडे | Published: August 11, 2023 07:49 PM2023-08-11T19:49:29+5:302023-08-11T19:49:48+5:30
खून करून मृतदेह नदीत फेकला : जबलपूरमध्येच लपला होता आरोपी
नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान यांची हत्याच झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. मागील १० दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या व गुरुवारीच मानकापूर पोलीस ठाण्यात आरोपी अमित साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मानकापूर पोलीस ठाणे, गुन्हे शाखेच्या पथकाने जबलपूर पोलिसांच्या सहकार्याने आरोपीला जबलपुरमधूनच अटक केली. तो मागील १० दिवसांपासून तेथेच लपून बसला होता. त्याच्या चौकशीतून हत्येचे नेमके कारण समोर येईल. पोलिसांचे पथक त्याला नागपुरकडे घेऊन निघाले आहे.
सना खान या १ ऑगस्टला अमित साहूला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या बेपत्ताच होत्या. नागपूर पोलिसांचे पथक जबलपूरला जाऊन आले. मात्र हाती काहीच ठोस लागले नव्हते. तर जबलपूर पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली नव्हती. दरम्यान, पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौडला अटक केली. त्याने चौकशीदरम्यान अमितची गाडी धुतल्याची कबुली दिली.
गाडीत रक्त सांडले होते व त्याच्या सांगण्यावरून गाडी स्वच्छ केल्याची तसेच रक्ताने माखलेले कपडे एका नदीत फेकल्याची त्याने माहिती दिली. त्यामुळे सना यांच्यासोबत बरेवाईट झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र जबलपूर पोलिस तपास करत असल्याने नागपूर पोलिसांच्या पथकाला हात हलवत परत यावे लागले होते. गुरुवारी सना खान यांच्या आईने मानकापूर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर तातडीने मानकापूर व गुन्हे शाखेचे पथक परत जबलपूरला पाठविण्यात आले.
अगोदर पथक जबलपुरला गेले होते व तेथील काही ‘लिंक्स’ मिळाल्या होत्या. ईलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सचीदेखील मदत घेण्यात येत होती. अखेर अमित साहू जबलपुरमध्येच लपून बसला असल्याची पक्की ‘टीप’ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला गोळाबाजार चौकी परिसरातून अटक केली. अमित साहूने चौकशीदरम्यान सना खान हिची हत्या केल्याची कबुली दिली. जितेंद्र गौडसह त्याला नागपुरकडे आणण्यात येत असून शनिवारी त्याच्या चौकशीतून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली.