बंगालमधील राजकीय हिंसाचाराविरोधात भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:08 AM2021-05-06T04:08:11+5:302021-05-06T04:08:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तेथे सुरू झालेल्या राजकीय हिंसाचाराविरोधात बुधवारी भाजपने आंदोलन केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तेथे सुरू झालेल्या राजकीय हिंसाचाराविरोधात बुधवारी भाजपने आंदोलन केले. याअंतर्गत नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील ३०० हून अधिक ठिकाणी लहान लहान गटांमध्ये धरणे दिले. बंगालमध्ये राज्य शासनातर्फे पुरस्कृत हिंसाचार सुरू असून, ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना असल्याचा आरोप भाजपतर्फे लावण्यात आला.
भाजपच्या टिळक पुतळास्थित कार्यालयाजवळ सकाळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांकेतिक आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, प्रदेश सचिव अर्चना डेहनकर हे देखील उपस्थित होते. बंगालमधील हिंसाचाराविरोधात पुरोगामी लोक मौन बाळगून आहेत. लोकशाहीवरील हे मोठे संकट आहे, अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली. या हिंसाचाराची न्यायालय निश्चितच दखल घेईल. कोरोना असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन करण्याचे टाळले आहे. मात्र ज्या भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाले, त्यांच्या कुटुंबीयांना देशभरातील कार्यकर्त्यांकडून आर्थिक मदत करण्यात येईल, असेदेखील फडणवीस यांनी सांगितले.
शहरात विविध ठिकाणी आंदोलन झाले. शहीद चौकातील आंदोलनात आ. गिरीश व्यास, किशोर पलांदूरकर उपस्थित होते. पूर्व नागपुरात आ. कृष्णा खोपडे, संजय अवचट यांच्या उपस्थितीत सतरंजीपुरा, वैष्णोदेवी चौक, छापरूनगर येथे आंदोलन झाले. याशिवाय दक्षिण नागपूर, पश्चिम नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर, पश्चिम नागपुरातदेखील कार्यकर्त्यांनी धरणे दिले.