मनपा निवडणुकीसाठी भाजपचा ‘महासंपर्क’
By admin | Published: June 24, 2015 02:57 AM2015-06-24T02:57:34+5:302015-06-24T02:57:34+5:30
केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना नागपूर महापालिकेत मात्र असलेली सत्ता हातून जाऊ नये,
दीडपट जागांचे टार्गेट : कार्यकर्त्यांवर वॉच
नागपूर : केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना नागपूर महापालिकेत मात्र असलेली सत्ता हातून जाऊ नये, यावर भाजप नेत्यांनी गंभीरपणे विचार करण्यास सुरुवात केली आहे. हेवीवेट केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री असलेल्या शहरातील महापालिकेत भाजप हरली तर मोठी नामुष्की ओढवेल, याची धास्ती भाजपने घेतली आहे. त्यामुळेच महापालिका निवडणूक दीड वर्षांवर असली तरी महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदार भेटीची रंगीत तालीम कार्यकर्त्यांकडून करवून घेतली जाणार आहे.
भाजपचा पसारा नागपूर शहरात निश्चितच वाढला आहे. शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वाखाली सहा लाखांवर सदस्य नोंदणी करण्यात आली आहे. येत्या काळात १०० सदस्यांची नोंदणी करणाऱ्यांना क्रियाशील सदस्य बनविले जाणार आहे. मध्यंतरी मोबाईल व इंटरनेटवर नोंदणी करून सदस्य करण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र, या सदस्यांपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्याने प्रत्यक्ष पोहचावे, यासाठी महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी नव्याने सदस्य झालेल्यांच्या प्रभाग व वॉर्डनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक झाली. तीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. कृष्णा खोपडे यांच्याकडेच शहर अध्यक्षपदाची धुरा कायम ठेवण्याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच त्यांनी महापालिकेत सध्यापेक्षा दीडपट जागा जिंकण्याचे टार्गेट कार्यकर्त्यांना दिले.
विशेष म्हणजे केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनीही कार्यकर्त्यांना नेत्यांच्या मागे हार घालत मिरवण्यापेक्षा वॉर्डात जाऊन जनतेची कामे करण्याचा सल्ला दिला. या दोन्ही नेत्यांनी केलेले आवाहन व दिलेला सल्ला यावरून महापालिकेची निवडणूक भाजपने आतापासून गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट होते.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काही अपक्ष नगरसेवकांनी भाजपला भक्कमपणे मदत केली. तर दुसऱ्या पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांनीही जोर लावला. अशात या दोन्ही बाजू सांभाळत स्थानिक भाजप कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी भाजपची तारेवरची कसरत होणार आहे. मात्र, भाजप कार्यकर्त्याचे नाव वॉर्डातील नागरिकांकडून समोर आले तर त्याचा प्रथम विचार केला जाईल, असे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून इच्छुक कार्यकर्ते वॉर्डात आपापल्या अस्तित्वाची चाचपणी करणार आहेत. (प्रतिनिधी)