भाजपचे ‘बूथ पॉलिटिक्स’, प्रत्येक पदाधिकाऱ्याला दोन बुथचे टार्गेट
By योगेश पांडे | Published: March 18, 2024 06:54 PM2024-03-18T18:54:23+5:302024-03-18T18:54:54+5:30
भाजपने बुथस्तरीय संघटन मजबुतीवर अगोदरपासूनच भर दिला आहे. आता प्रत्येक बुथवर बैठकांचे सत्र सुरू आहे.
नागपूर : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर भाजपकडून प्रचारावर भर देण्यात येत आहे. विशेषत: अगदी बुथपातळीवरून जाऊन नागरिकांशी संपर्क करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक नेता, पदाधिकाऱ्याला दोन बुथचे टार्गेट देण्यात आले असून तेथे ५१ टक्के मते मिळविण्याची जबाबदारी संबंधित नेत्याची असेल. त्यामुळे नेता-पदाधिकाऱ्यांच्या परफॉर्मन्सचेदेखील या माध्यमातून मूल्यांकन होणार आहे.
भाजपने बुथस्तरीय संघटन मजबुतीवर अगोदरपासूनच भर दिला आहे. आता प्रत्येक बुथवर बैठकांचे सत्र सुरू आहे. प्रत्येक नेता, पदाधिकाऱ्यांना दोन बुथची जबाबदारी घेण्याचे निर्देशच पक्षाकडून देण्यात आले. संबंधित नेता, पदाधिकाऱ्यांना त्या दोन बुथवर जाऊन तेथील आढावा घेत प्रचाराचे नियोजन, गृहसंपर्क करायचा आहे. तसेच तेथील कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन त्यांना २४ विषयांना घेऊन कार्ययोजना तयार करण्याच्या सूचनादेखील द्यायच्या आहेत. संबंधित बुथवर कमीत कमी ५१ टक्के मतांचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या स्वत:कडे कामठी विधानसभा क्षेत्राअंतर्गत २८ व २९ क्रमांकाच्या दोन बुथची जबाबदारी आहे. सर्व नेते, पदाधिकारी सूपर वॉरिअर म्हणून काम करतील. महाराष्ट्रातील ९७ हजार १२५ बुथवर बुथस्तरीय कार्ययोजना राबविण्यात येत आहे. भाजपाचे ३३ हजार ३२३ पदाधिकारी विकसित भारताचा संकल्प घरोघरी पोहचविणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.