भाजपच्या प्रचाराचा मंत्र, मंदिरांचे वापरणार तंत्र; राम नवमीसाठी विशेष नियोजन
By योगेश पांडे | Published: March 29, 2024 11:50 PM2024-03-29T23:50:47+5:302024-03-29T23:53:12+5:30
शेकडो मंदिरांच्या माध्यमातून प्रचार मोहिमेवर भर
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, भाजपकडून सोशल माध्यमे, थेट गृहसंपर्क यांच्यासोबतच वेगळे प्रचारतंत्रदेखील वापरण्यात येत आहे. प्रत्येक बूथवर शंभर ते दीडशे मते वाढविण्याचे टार्गेट पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. हा आकडा गाठण्यासाठी शहरातील शेकडो मंदिरांच्या माध्यमातून भाजपकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रचारावर भर देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजनाला सुरुवातदेखील झाली आहे.
अयोध्येतील राममंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. याशिवाय अनेक मंदिरांना भाजपकडून थेट किंवा कुणाच्या माध्यमातून विविध प्रकारची मदत करण्यात येत होती. यात महाप्रसाद, साहित्य वाटप, जीर्णोद्धार, परिसर नूतनीकरण किंवा इतर बाबींचा समावेश होता. मागील पाच वर्षांच्या कालावधीत याच मंदिरांच्या माध्यमातून शेकडो भजन मंडळांनादेखील विविध पद्धतीचे सहकार्य करण्यात आले. अगदी वस्तीवस्तीमध्येदेखील भजन कीर्तनांच्या कार्यक्रमांचे नियमितपणे आयोजन सुरू झाले. याशिवाय काही धार्मिक कार्यक्रमांसाठीदेखील विशेष नियोजन करण्यात आले होते.
या सर्व मंदिरांची भाजपकडून यादीच तयार करण्यात आली आहे. आता निवडणुका जाहीर झाल्यावर भाजपने या सर्व मंदिरांशी संपर्क केला असून, तेथील तंत्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रचारावर भर देण्यात येत आहे. लवकरच सर्व मंदिरांसमोर अयोध्येशी निगडित पोस्टर्स लावण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.
‘बूथ चलो’सोबत ‘मंदिर चलो’देखील
भाजपने प्रत्येक प्रभागातील मंदिरांची यादीच बनविली आहे. एकीकडे शहरातील सहाही विधानसभा मंडळांच्या सर्व प्रभागांमध्ये बूथ चलो मोहीम राबविण्यात येत आहे. तर दुसरीकडे प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंदिरांमध्येदेखील जाऊन संपर्क करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
रामनवमीसाठी विशेष नियोजन
१९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असून, १७ एप्रिल रोजी रामनवमी आहे. भाजपकडून राममंदिराचे क्रेडिट घेण्यात येत असताना आता लोकसभेतील मतांसाठी रामनवमीच्या दिवशी वातावरणनिर्मिती करण्यावर भर राहणार आहे. रामनवमीचा दिवस प्रचाराचा अखेरचा दिवस राहणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मंडळ अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.