भोयरांच्या ‘एक्झिट’मुळे भाजपची सावध भूमिका; बड्या नेत्यांचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 07:00 AM2021-11-23T07:00:00+5:302021-11-23T07:00:12+5:30

Nagpur News नागपुरातील नगरसेवक छोटू भोयर यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. कार्यकर्त्यांमध्ये याबाबत संमिश्र भावना असल्या तरी मोठ्या नेत्यांनी मात्र मौन बाळगले आहे.

BJP's cautious role due to Bhoyar's 'exit'; The silence of big leaders | भोयरांच्या ‘एक्झिट’मुळे भाजपची सावध भूमिका; बड्या नेत्यांचे मौन

भोयरांच्या ‘एक्झिट’मुळे भाजपची सावध भूमिका; बड्या नेत्यांचे मौन

Next
ठळक मुद्देपक्षात सर्वकाही आलबेल नाहीआणखी काही पदाधिकारी नाराज

योगेश पांडे

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून घडलेले व मागील २४ वर्षांपासून भाजपच्या नागपुरातील प्रवासातील महत्त्वाचा भाग राहिलेले नगरसेवक छोटू भोयर यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमधील अनेक पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. कार्यकर्त्यांमध्ये याबाबत संमिश्र भावना असल्या तरी मोठ्या नेत्यांनी मात्र मौन बाळगले आहे. पक्षातील आणखी काही वरिष्ठ पदाधिकारी नाराज असून, मनपा निवडणुकांच्या ऐन तोंडावर भोयर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

संघभूमीत संघाच्याच निष्ठावंत पदाधिकाऱ्याला आपल्या गोटात घेऊन काँग्रेसने राजकारणाच्या पटावर भाजपला धक्का देणारी चाल खेळली आहे. भाजपमध्ये ऑल इज वेल असल्याचा दावा पदाधिकारी करत आहेत. मात्र प्रत्यक्षात अंतर्गत चित्र वेगळे आहे. पक्षांतर्गत तक्रारी वाढल्या असून, अनेक पदाधिकाऱ्यांच्या मनात खदखद आहे. काही विशिष्ट लोकांनाच झुकते माप दिले जात असल्याची अनेकांची भावना आहे.

पदवीधर मतदारसंघात ऐनवेळी अनिल सोले यांच्याऐवजी संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे सोलेदेखील नाराज झाले होते. दुसरीकडे दक्षिण नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे हे देखील काही प्रमाणात नाराज होते. मात्र हे नेते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पक्षाचे पदाधिकारी काही ना काही पद्धतीने नाराजांना समजविण्याचा प्रयत्न करत असतानाच हा मोठा बॉम्ब पडला आहे.

भाजपसमोर मोठे आव्हान

प्रभाग रचनेत बदल झाल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारीची समीकरणे बदलणार आहेत. दुसरीकडे निष्क्रिय नगरसेवकांना नारळ देण्याची भाजपची तयारी आहे. खुद्द नितीन गडकरी यांनीदेखील सर्वेक्षणाच्या आधारावरच तिकीट देण्याची सूचना केली आहे. अशा स्थितीत तिकीट मिळेल की नाही, या चिंतेत अनेक नगरसेवक आहेत. अनिश्चिततेच्या वातावरणात तिकीट वाटप सुरू असताना, या नाराजांना समजविण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

गडकरी, फडणवीसांशी चर्चा का नाही

बावनकुळे यांनी सोमवारी अर्ज भरला असला तरी, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा भोयर यांच्या राजीनाम्याचीच होती. इतके वर्ष भोयर भाजपमध्ये होते व पक्षाने त्यांना संधीदेखील दिली. असे असताना मनातील नाराजी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यापेक्षा ते प्रसारमाध्यमात का गेले, असा सवाल भाजपच्याच एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर केला. भोयर यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा का केली नाही, असा सवालदेखील पदाधिकारी उपस्थित करत होते. फडणवीस व गडकरी या दोघांनीही या विषयावर काहीच भाष्य केलेले नाही.

शहराध्यक्ष म्हणतात, संघटन मजबूत

यासंदर्भात शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांना विचारणा केली असता, त्यांनी भोयर यांचा राजीनामा मिळाला असून, पक्ष पदाधिकाऱ्यांना त्याची माहिती दिल्याचे सांगितले. कुणाच्या जाण्याने भाजपला फारसा फरक पडणार नाही, कारण व्यक्तिकेंद्रित नव्हे तर कार्यकर्त्यांच्या आधारावर पक्षाचे काम चालते. भोयर यांनी असा निर्णय का घेतला, याची कल्पना नाही. मात्र, भाजपचे संघटन मजबूत असल्याचा दावा दटके यांनी केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातच दिसली नाराजी

भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच दिसून आले. पक्षाच्या एका माजी आमदारांनी मोठ्या पदाधिकाऱ्यांकडे भावना बोलून दाखविली. अनेक पदाधिकारी माझ्याकडे दुर्लक्ष करतात व मला मोठी जबाबदारी का दिली जात नाही, हा त्यांचा सवालच त्यांच्या मनातील खदखद सांगून गेला.

Web Title: BJP's cautious role due to Bhoyar's 'exit'; The silence of big leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा