स्वार्थ अन् पुत्र प्रेमासाठी युती तोडली, उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 01:05 PM2023-02-13T13:05:51+5:302023-02-13T13:06:24+5:30
उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांना संबोधन केलेल्या भाषणावेळी भाजपने युती तोडल्याचं म्हटलं.
नागपूर - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी उत्तर भारतीयांना पाठिंब्यासाठी आवाहन केले. 'मी आज तुमची साथ मागायला आलो आहे. तुम्ही अनेक पिढ्यांपासून इथे राहता. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. हा मेळावा नाही, बैठक आहे. मेळाव्यासाठी मैदान अपुरं पडेल. यावेळी, हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपलाही लक्ष्य केलं. तसेच, शिवसेनेनं भाजपसोबत युती तोडल्याचंही सांगितलं. आता, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. पुत्रप्रेमापोटी युती तोडल्याचा आरोप बावनकुळे यांनी केलाय.
उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांना संबोधन केलेल्या भाषणावेळी भाजपने युती तोडल्याचं म्हटलं. त्यावर, बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व तोडून पाठीत खंजीर खुपसला. आता, त्यांना चूक लक्षात आली आहे, माझी चूक झाली हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. पण, आता बोलता येत नसल्याची परिस्थिती आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले. तसेच, काँग्रेसची विचारधारा स्विकारुन भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून युती तोडली. त्यामुळे, युती तोडण्याला जबाबदार फक्त उध्दव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पुत्र प्रेम आहे, अशा शब्दात बावनकुळे यांनी पलटवार केला. तसेच, सावरकरांचा अपमान होत असताना सरकार जाईल म्हणून तोंडाला पट्टी बांधली, आता हिंदुत्ववावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
मी आपलं नातं मजबूत करण्यासाठी आलो आहे. आपण एकमेकांना हिंदू मानत असू, तर उत्तर भारतीय आणि मराठी वेगळे व्हायला नको,' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांना साद घातली. तसेच, भाजपवरही जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले, 'गेल्या 25-30 वर्षांपासून आमची युती होती, आम्ही निभावली पण त्यांनी तोडली. आमची त्या पक्षासोबत आपुलकी होती, पण ते वर जाऊन बसले आणि त्यांनी आम्हाला दूर केले. 95 पूर्वी शिवसेना आणि भाजपला कुणी साथ देत नव्हते, आमच्यावर धार्मिक असल्याचा ठपका होता. तेव्हा माझ्या वडिलांनी तत्कालीन पंतप्रधनांना पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांनी कधीच उत्तर भारतीयांचा किंवा मुस्लिमांचा द्वेष केला नाही. जो देशाच्या विरोधात होता, त्यालाच बाळासाहेबांनी विरोध केला.'