भाजपकडून ३४ जागांची मागणी, मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आल्याने तडजोड - चंद्रशेखर बावनकुळे
By योगेश पांडे | Published: April 17, 2024 05:15 PM2024-04-17T17:15:27+5:302024-04-17T17:15:48+5:30
आम्ही महायुतीचे उमेदवार ठरविताना शिवसेना व राष्ट्रवादीला विश्वासात घेतले होते. जिंकणे हेच आमचे ध्येय आहे.
नागपूर : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भाजपला ३४ जागा मिळाव्या ही पक्षाध्यक्ष म्हणून माझी व कोअर ग्रुपचीदेखील मागणी होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा सन्मान राखणेदेखील महत्त्वाचे होते. महायुतीचे जागावाटप करताना आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलो व त्यामुळेच काही जागांवर तडजोड करावी लागली, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आम्ही महायुतीचे उमेदवार ठरविताना शिवसेना व राष्ट्रवादीला विश्वासात घेतले होते. जिंकणे हेच आमचे ध्येय आहे. कुठलीही रिस्क नको म्हणून तीनही पक्षांनी काही उमेदवार बदलले. यात आमच्याकडून ढवळाढवळ करण्याचा प्रश्न येत नाही. तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बसून उमेदवार ठरविले. शिंदे १३ खासदार घेऊन महायुतीत आले होते व आता १५ मतदारसंघात त्यांचे उमेदवार उतरले आहेत. आमच्या सर्व सर्वेक्षणाची माहिती दोन्ही पक्षांना दिली होती, असे बावनकुळे यांनी सांगितले.
सर्व पक्षांचे मत घेऊनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली. विधानसभेत एक-दोन जागांसाठी तडजोड करावी लागली तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही. विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या २०० हून अधिक जागा महायुतीच्या निवडून येतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांना कॉंग्रेसने धोका दिला
बाबासाहेब आंबेडकरांना कॉंग्रेसने मुंबई, भंडाऱ्यात पराभूत केले होते. तर प्रकाश आंबेडकर यांनादेखील कॉंग्रेसने वर येऊ दिले नाही. कॉंग्रेसमुळेच आंबेडकर महाविकास आघाडीत जाऊ शकले नाही. कॉंग्रेसने त्यांना धोका दिला, असा आरोप बावनकुळे यांनी केला.