भाजपाचे निवडणूक चिन्ह ‘गाजर’च हवे
By admin | Published: February 15, 2017 03:23 AM2017-02-15T03:23:37+5:302017-02-15T03:23:37+5:30
भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यापूर्वी व आल्यानंतर जनतेला केवळ आश्वासनांचे गाजरच दाखविले आहे.
नितेश राणे : शिवसेना-भाजपाचे ‘मॅनेज मॅरेज’
नागपूर : भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यापूर्वी व आल्यानंतर जनतेला केवळ आश्वासनांचे गाजरच दाखविले आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेकडूनदेखील या गाजरावर टीका करण्यात येत आहे. भाजपाचे निवडणूक चिन्ह ‘गाजर’ हेच करण्यात यावे, या शब्दांत कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी हल्लाबोल केला. दक्षिण नागपुरातील त्रिशरण चौकात आयोजित प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते.
यावेळी मंचावर माजी आमदार अशोक धवड, माजी महापौर पांडुरंग हिवरकर तसेच विशाल मुत्तेमवार, कुणाल पुरी प्रामुख्याने उपस्थित होते. निवडणूका आल्यानंतर शिवसेना व भाजपामध्ये कुरबुरी सुरू झाल्या. मुळात ही युती म्हणजे ‘मॅनेज मॅरेज’ प्रमाणे आहे. सामान्य जनतेशी नेत्यांना काहीही घेणेदेणे नाही, असे प्रतिपादन नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी हे दोघेही नागपूरचे वजनदार मंत्री आहेत. मात्र विकासाच्यासंदर्भात त्यांचे राजकीय वजन कुठेच दिसून येत नाही. संत्रानगरी असलेल्या नागपुरची आता ‘क्राईम कॅपिटल’ अशी ओळख झाली आहे. नागपुरात कायदा व सुव्यवस्था आदर्श असायला हवी होती. मात्र स्थिती नेमकी उलट आहे. भाजपात गुंडांना उमेदवारी देण्यात येत आहे. , असा आरोप राणे यांनी लावला. यावेळी राणे यांनी बहुजन समाज पक्षावरदेखील टीका केली. बसपाला नागपुरात दिलेली मते वायाच जाणार आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
काँग्रेसचे काम
उद्धव ठाकरे करताहेत
यावेळी नितेश राणे यांनी भाजपा व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धावरदेखील भाष्य केले. उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये भाजपाची पोलखोल करत आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांना निवडणूकांत भाषणे करण्याची आवश्यकताच नाही. चौकाचौकांत केवळ उद्धव ठाकरे यांचे भाषण लावून द्यावे, असा टोलादेखील त्यांनी मारला.
वेगळा विदर्भ हवा कशाला ?
कुठल्याही मुद्द्यावर अडचणीत येणार असल्याचे दिसल्यावर भाजपाकडून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा समोर करण्यात येतो. मुळात विदर्भात मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्याचे वित्त व उर्जामंत्री आहेत. अशा स्थितीत अडीच वर्षांत तर मोठ्या प्रमाणात विकास व्हायला हवा होता. विकास होण्यासाठी विदर्भ वेगळा करण्याची आवश्यकताच का आहे, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.