संघाच्या पावलावर भाजपाचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:07 AM2017-08-28T01:07:28+5:302017-08-28T01:09:42+5:30
घरदार सोडून संघटनेसाठी पूर्णवेळ झोकून देणाºया प्रचारकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा सर्वदूर प्रसार झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरदार सोडून संघटनेसाठी पूर्णवेळ झोकून देणाºया प्रचारकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा सर्वदूर प्रसार झाला. संघाच्या या प्रणालीचा आता भारतीय जनता पक्षानेदेखील अवलंब केला असून विधानसभा क्षेत्रनिहाय पूर्णकालीन विस्तारकांची नेमणूक केली आहे. पक्षाचा प्रचार-प्रसार प्रभावी पद्धतीने करण्याची त्यांच्याकडे जबाबदारी राहणार असून राज्यभरात हे ‘मॉडेल’ राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपाला एकहाती यश मिळाले होते. राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणूकांत तर पक्षाला ‘रेकॉर्ड’ यश मिळाले. मात्र तरीदेखील पक्षाने कुठलाही धोका न पत्करता संघटनात्मक बांधणी व जनसंपर्कावर भर देण्याचा संकल्प केला आहे. याअंतर्गतच २ जूनपासून नागपुरात ‘बूथ विस्तारक’ योजनेची सुरुवात झाली. राज्यात इतरही ठिकाणी ही योजना राबविण्यात आली. एकट्या नागपुरात या माध्यमातून १९०० बूथवर थेट गृहसंपर्क अभियान राबविण्यात आले.
मात्र राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या सूचनेनुसार पक्षाने यापुढे जात आता पूर्णकालीन विस्तारकांची नेमणूक केली आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय ही नियुक्ती आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत यासंदर्भात सखोल बैठकदेखील झाली. या बैठकीला महाराष्ट्रासह पश्चिम क्षेत्रातील पाच राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, व्ही सतीश, विनय सहस्रबुद्धे याला प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य सरचिटणीस रामदास आंबटकर यांच्याकडे राज्य संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. विस्तारक योजनेचे विदर्भ संयोजक म्हणून देवेंद्र दस्तुरे हे काम पाहतील.
वेळोवेळी पाठवावा लागणार अहवाल
पूर्णकालीन विस्तारकांवर पक्षाच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी राहणार आहे. पक्षातील पदाधिकारी, कार्यकतर््ीे यांच्याकडून विधानसभा क्षेत्रात विविध प्रचार-प्रसार योजना राबविणे, शासनाची कामे-योजना तसेच पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षसंघटनेचा आणखी विस्तार करणे ही जबाबदारी या विस्तारकांवर राहणार आहे. वेळोवेळी विस्तारकांना वरिष्ठ पातळीवर कार्यअहवाल पाठवावा लागणार आहे.
भाजपाचे विदर्भावर विशेष लक्ष
यासंदर्भात विदर्भ संयोजक देवेंद्र दस्तुरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राज्याचे सात विभाग करण्यात आले असून विदर्भाचा एक संपूर्ण विभाग आहे. विदर्भात पक्ष संघटना आणखी मजबूत करण्याचा पक्षाचा मानस आहे. सद्यस्थितीत विस्तारकांची नेमणूक सहा महिने ते एक वर्षापर्यंत करण्यात आली आहे. विदर्भाचे संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांच्या मार्गदर्शनात विस्तारकांच्या कामावर लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात सहा विस्तारकांची नेमणूक झाल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील कार्यप्रणालीसंदर्भात रामदास आंबटकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.