मनपा पोटनिवडणुकीत भाजपाचे ग्वालबंशी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 09:33 PM2020-01-10T21:33:14+5:302020-01-10T22:13:38+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ (ड)च्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे विक्रम जगदीश ग्वालबंशी यांनी रेकॉर्ड ९६३६ मतांनी विजय प्राप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ (ड)च्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे विक्रम जगदीश ग्वालबंशी यांनी रेकॉर्ड ९६३६ मतांनी विजय प्राप्त केला. ग्वालबंशी यांना एकूण १३,३८६ मत मिळाली. दुसऱ्या क्रमांकार काँग्रेसचे पंकज सुरेंद्र शुक्ला राहिले. त्यांना केवळ ३७५० मते मिळाली. अपक्ष उमेदवार अशोक देवराव डोर्लिकर हे २६१७ मतांनी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
गुरूवारी प्रभाग १२ (ड) च्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. एकूण ३८.०९ टक्के मतदान झाले. ५८,१६२ मतदारांपैकी २२१५१ मतदारांनी मतदनाचा हक्क बजावला. आज मतगणना पार पडली. मतगणनेत भारिप बहुजन महासंघाचे प्रफुल्ल देवराव गणवीर यांना १५५०, आम आदमी पार्टीचे आकाश सुरेश कावळे यांना ६९० मत मिळाली. १५२ मतदारांनी नोटाला पसंती दिली.
शुक्रवारी मनपाच्या धरमपेठ झोनमध्ये सकाळी १० वाजता मतगणनेला सुरूवात झाली. सात फे ऱ्यांमध्ये मतगणना पूर्ण झाली. भाजपाचे विक्रम ग्वालबंशी हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. शेवटपर्यंत ही आघाडी तशीच कायम राहिली. अंतिम फेरीचे निकाल आल्यानंतर मनपा उपायुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी निर्भय जैन यांनी भाजपाचे विक्रम ग्वालबंशी यांना विजयी घोषित केले. यावेळी सहायक आयुक्त व निवडणूक अधिकारी प्रकाश वराडे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, धरमपेठ झोनचे सभापती अमर बागडे, माजी सभापती प्रमोद कौरती उपस्थित होते.
विशेष म्हणजे भाजपचे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांच्या अकाली निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. जगदीश ग्वालबंशी यांनी काँग्रेसचे दिनकर वानखेडे यांचा १६६७ मतांनी पराभव केला होता. अशा परिस्थितीत त्यांचा मुलगा विक्रम ग्वालबंशी यांचा रेकॉर्ड विजय भाजपासाठी आनंददायी आहे.
प्रभागातील उर्वरित कामांना पूर्ण करणार
विजयानंतर विक्रम ग्वालबंशी यांनी सांगितले की, ते प्रभाग १२ (ड) मध्ये त्यांच्या वडीलांनी केलेल्या कामांमुळेच निवडूण आले. त्यामुळे प्रभागात जी काही कामे शिल्लक राहिली आहे, ते पूर्ण करणार. मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. त्याला पूर्णपणे सार्थक करण्याचा प्रयत्न करीत राहणार.प्रभागाला विकसित करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री राहिलेले विक्रम बी.कॉम. पर्यंत शिकलेले आहे.