देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालक, बदलायचेय १८ मतदारसंघांचे ‘मालक’

By कमलेश वानखेडे | Published: October 11, 2022 10:25 AM2022-10-11T10:25:45+5:302022-10-11T10:32:13+5:30

डीपीसीच्या माध्यमातून विकासकामांवर भर : भाजप नेत्यांकडून येताहेत कामांचे प्रस्ताव

BJP's micro-planning to win 18 assembly constituencies held by the opposition in 6 districts | देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालक, बदलायचेय १८ मतदारसंघांचे ‘मालक’

देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालक, बदलायचेय १८ मतदारसंघांचे ‘मालक’

Next

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, अमरावती, अकोला या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद स्वीकारले. यावर ते स्पायडरमॅन आहेत का, अशी टीकाही विरोेधकांकडून झाली. मात्र, फडणवीसांच्या या पालकमंत्रिपदामागे संबंधित सहा जिल्ह्यांत विरोधकांच्या ताब्यात असलेल्या विधानसभेच्या १८ मतदारसंघांत जास्तीत जास्त निधी देऊन ते मतदारसंघ पुढील काळात जिंकण्याचे मायक्रो प्लानिंग भाजपने केले आहे.

भाजपला सत्तेच्या ‘मॅजिक फिगर’पर्यंत पोहोचायचे असेल तर विदर्भातील जास्तीत जास्त जागा जिंकून आणणे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आवश्यक आहे. विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत. यापैकी फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारलेल्या सहा जिल्ह्यांत ३५ जागा आहेत. सद्यस्थितीत या ३५पैकी १७ जागा भाजपच्या ताब्यात तर १८ जागा इतर पक्ष व अपक्षांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत आहे त्या जागा कायम राखण्यासह स्वत:कडे नसलेल्या या १८पैकी जास्तीत जास्त जागा जिंकणे भाजपसाठी आवश्यक आहे. भंडारा व अमरावती जिल्ह्यांत भाजपला हवे तसे संख्याबळ नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या सहा जिल्ह्यांचे पालकत्व सोपविण्यात आल्याची माहिती आहे.

शासकीय अर्थपुरवठ्याचे नियोजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ मंत्रालय देखील आहे. त्यामुळे या १८ मतदारसंघांना आतापासूनच शासकीय अर्थ पुरवठा पोहोचवून पक्षाच्या प्रस्तावित उमेदवारांना ताकद देण्याची योजना आखण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या मतदार संघांमध्ये जास्तीत जास्त निधी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती ते नगर परिषदांपर्यंत भाजप नेत्यांच्या माध्यमातून विकासकामांचे प्रस्ताव सादर केले जात असून, त्या प्रस्तावांना पुढील टप्प्यात मंजुरी दिली जाणार आहे.

जयस्वाल, भोंडेकर शिंदे गटात, रवी राणा भाजपसोबत

- भाजपकडे नसलेल्या जागांपैकी नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल व भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिंदे गटात सामील झाले आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आधीच भाजपला समर्थन दिले असून, भविष्यात तेच उमेदवार असतील, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या तीन जागा कायम राखण्यासाठी भाजपकडून ताकद लावली जाणार आहे.

असे आहे भाजपचे संख्याबळ

*जिल्हा - एकूण जागा - भाजप - इतर*

नागपूर - १२ - ०७ - ०५

वर्धा - ०४ - ०३ - ०१

भंडारा - ०३ - ०० - ०३

गडचिरोली ०३ - ०२ - ०१

अमरावती - ०८ - ०१ - ०७

अकोला - ०५ - ०४ - ०१

एकूण - ३५ - १७ - १८

Web Title: BJP's micro-planning to win 18 assembly constituencies held by the opposition in 6 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.