भाजपचे ‘मिशन युवा मतदार’, कार्यकारिणीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा; पारेंद्र पटले, कल्याण देशपांडे भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदी
By योगेश पांडे | Published: August 3, 2023 08:52 PM2023-08-03T20:52:13+5:302023-08-03T20:52:26+5:30
आगामी निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.
नागपूर : आगामी निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. भाजयुमोचे नागपूर शहराध्यक्ष पारेंद्र पटले व कल्याण देशपांडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या दृष्टीने भाजपकडून संघटनेत काही बदल करण्यात येत आहेत. त्याअंतर्गतच राज्यातील अनेक जिल्ह्यांतील अध्यक्ष बदलण्यात आले. निवडणूकांमध्ये अनेक मतदारसंघात भाजपची तरुण मतदारांवर भिस्त राहणार असून भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचे नियोजन सुरू आहे.
भाजपने काही आठवड्यांअगोदरच विविध ठिकाणी ‘सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्स’ची बैठक घेत तरुण मतदारांना साद घालण्याच्या हालचालींना सुरुवात केली. भाजयुमोच्या प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार होण्याचे संकेत काही दिवसांपासून मिळत होते. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावांची गुरुवारी घोषणा केली. मागील दोन वर्षांपासून अधिक काळापासून शहराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असलेल्या पटले यांना राज्यपातळीवरील जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रदेश कार्यकारिणीत अगोदरपासूनच असलेल्या देशपांडे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. याशिवाय दिपांशु लिंगायत यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवानी दाणीकडे सरचिटणीसपद देण्यात आले आहे.