भाजपचे ‘आॅफिस’ लहान मात्र ‘मॅनेजमेंट’ मोठे
By admin | Published: September 24, 2016 01:08 AM2016-09-24T01:08:56+5:302016-09-24T01:08:56+5:30
महालात गांधीसागर तलावाला लागूनच टिळक पुतळा चौकात एका जुन्या इमारतीत भाजपचे कार्यालय आहे.
टिळक पुतळा कार्यालयातून शहर व ग्रामीणचा कारभार : पक्ष वाढला, कार्यालय पडते लहान
नागपूर : महालात गांधीसागर तलावाला लागूनच टिळक पुतळा चौकात एका जुन्या इमारतीत भाजपचे कार्यालय आहे. तसे तर १९४० पासून येथे कार्यालय सुरू आहे. सर्वप्रथम येथे जनसंघाचे कार्यालय होते. त्यानंतर जनता पार्टीचे कार्यालय सुरू झाले व त्यानंतर त्याच ठिकाणी भाजपचे कार्यालय सुरू करण्यात आले. जनसंघ ते भाजप असा ७५ वर्षांचा प्रवास या कार्यालयाने अनुभवला आहे. सभा, बैठका, प्रचार, प्रसार, निवडणुका या सर्व बाबींचे भाजपचे नागपूर शहर व जिल्ह्यातील संपूर्ण मॅनेजमेंट याच कार्यालयातून चालते.
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे ११०० चौरस फुटाच्या जागेत नागपूर शहर व नागपूर ग्रामीण जिल्हा अशी दोन्ही कार्यालये आहेत. पक्षाचे कार्यालय छोटे असले तरी येथे नागपूर शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे व नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार या दोन्ही अध्यक्षांचे स्वतंत्र कक्ष आहेत. दोन्ही अध्यक्ष येथून स्वतंत्ररीत्या आपला कारभार चालवितात. बैठकांसाठी एक हॉल आहे. त्यामुळे एकाच दिवशी शहर व ग्रामीणची वेगवेगळी बैठक घ्यायची झाल्यास वेळेचे नियोजन केले जाते. तीन वर्षांपूर्वी हे कार्यालय आहे त्यापेक्षा लहान होते. त्यावेळी कार्यालयातील हॉलमध्ये ५० ते ६० लोक बसू शकत होते. नंतर शेजारचा ब्लॉकही घेण्यात आला. त्यामुळे आता १०० लोक बसू शकतात. भाजपचा पसारा वाढला आहे. त्यामुळे लहान बैठक असली तरी हॉल खचाखच भरतो. बऱ्याचदा पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांना गॅलरीसह जागा मिळेल तेथे उभे राहूनच बैठकीत सहभागी व्हावे लागते.