देशात अध्यक्षीय प्रणाली आणण्याचा भाजपचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 10:33 PM2023-04-01T22:33:55+5:302023-04-01T22:35:19+5:30
Nagpur News देशात हुकूमशाही किंवा अध्यक्षीय पद्धती आणण्याचा भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे पत्रपरिषदेत केला.
नागपूर : देशाच्या इतिहासात प्रथमच पैशांच्या जोरावर बहुमतातील सरकार पाडले जात आहे. छोटे पक्ष संपविण्याच्या गोष्टी केल्या जात असून, त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा लावला जात आहे. त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली जात आहे. हे सर्व एका षड्यंत्रानुसार सुरू असून देशात हुकूमशाही किंवा अध्यक्षीय पद्धती आणण्याचा भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे पत्रपरिषदेत केला.
भाजप सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या ओबीसी, एस.सी., एस.टी. व अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शनिवारी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. मोघे म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा भ्रष्टाचार व हुकूमशाही विरोधात संसदेत आणि रस्त्यावर लढा देऊन जनतेसमोर सत्य मांडले. शिवाय भारत जोडो यात्रेतून त्यांची प्रतिमा उजळली होती. त्याच धास्तीतून मोदी सरकारने षडयंत्र रचून त्यांचा आवाज दाबण्यासाठी सुरत कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेत खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला. अदानीच्या प्रश्नांवर गत काही दिवसांपासून संसद ठप्प आहे. त्यावर सरकार उत्तर देत नाही. त्यावर आवाज उचलणाऱ्यांना छोट्या पक्षांना टार्गेट केले जात आहे. असेच चित्र राहिल्यास २०२४ नंतर देशात हुकूमशाही किंवा अध्यक्षीय पद्धत अस्तित्वात येईल, असा दावाही त्यांनी केला. पत्रपरिषदेला माजी आ. नामदेव उसेंडी, गोविंद भेंडारकर, वसीम खान, राहुल घरडे, फजल रहमान, प्रदीप मसराम, दशरथ मडावी, संजय दुधे उपस्थित होते.
संघाचेही ऐकेनात मोदी !
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही असा प्रकार नव्हता. मात्र, दिवसेंदिवस देशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. प्रतिमा उंचावण्याच्या नादात संघापेक्षाही मोदी मोठे झाले आहेत. मोदी संघाचेही ऐकत नाहीत, असेही मोघे म्हणाले.