नागपुरात भाजपचा सेफ गेम काँग्रेसची कोंडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:02 AM2020-06-25T11:02:25+5:302020-06-25T11:02:47+5:30
नागपुरात काँग्रेस व शिवसेना सदस्यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकृत करून सेफ गेम खेळला आहे. या स्थगन प्रस्तावामुळे काँग्रेस सदस्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्त व भाजपा पदाधिकारी यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. सर्वसाधारण सभेत आयुक्तांवर वैयक्तिक टीका करून त्यांना धारेवर धरले. त्यात महापौर संदीप जोशी व सत्ता पक्षनेते संदीप जाधव यांनी आयुक्तांच्या विरोधात सदर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी करताना काँग्रेसची साथ मिळावी, या हेतूने सत्तापक्षाने स्थगन प्रस्ताव मांडला नाही. काँग्रेस व शिवसेना सदस्यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकृत करून सेफ गेम खेळला आहे. या स्थगन प्रस्तावामुळे काँग्रेस सदस्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
स्थगन प्रस्ताव नियमात असला तरी तो स्वीकृत करायचा की नाही, हा निर्णय सत्तापक्षावर अवलंबून असतो. महापालिकेत सत्ताधारी व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद वाढला आहे. सत्ता पक्षालाही आयुक्तांच्या विरोधात सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडता आला परंतु यात काँग्रेसची साथ मिळाल्यास त्यांची कोंडी करता येईल या हेतूने काँग्रेसचे नितीन साठवणे व शिवसेनेच्या मंगला गवरे यांचे स्थगन प्रस्ताव चर्चेसाठी महापौरांनी स्वीकृत केले.
आयुक्तांच्या विरोधातील स्थगन मागे घ्यावा यासाठी शिवसेनेच्या नेत्यांचा दबाव आल्याने मंगला गवरे यांनी सोमवारी प्रस्ताव मागे घेत असल्याचे पत्र महापौरांना दिले. मात्र एकदा स्वीकृत केलेला स्थगन प्रस्ताव मागे घेता येत नसल्याने दोन्ही प्रस्ताव क्लब करून बहुमताने चर्चेसाठी घेण्यात आले.
दरम्यान नितीन साठवणे यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांना पत्र पाठवले. पत्रानुसार वनवे यांनी नितीन साठवणे यांना प्रस्ताव मागे घेण्यासंदर्भात पत्र दिले. प्रस्ताव मागे न घेतल्यास शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असा इशारा या पत्रातून दिला आहे. मात्र प्रस्ताव मांडताना विरोधी पक्षनेते यांच्या सहमतीने हा प्रस्ताव मांडला होता. सभागृहातील काँग्रेसचे सदस्य प्रस्ताव मांडण्याचे बाजूने होते. परंतु या प्रस्तावाच्या निमित्ताने चर्चेदरम्यान भाजप नगरसेवकांना आयुक्तांना धारेवर धरण्याची आयतीच संधी मिळाली. दुसरीकडे काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांना बुधवारी सभागृहात बचावात्मक भूमिका घ्यावी लागली.
प्रभागातील अत्यावश्यक कामासाठी निधी उपलब्ध करावा. नगरसेवकांना विश्वासात घ्यावे.अशा अशा स्वरूपाची भूमिका काँग्रेस नगरसेवकांनी मांडली. शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया यांनी आयुक्तांच्या कामाची प्रशंसा केली. काँग्रेसचे बंटी शेळके व कमलेश चौधरी यांनी उघडपणे आयुक्तांचे समर्थन केले. काँग्रेसच्या अन्य नगरसेवकांनी चर्चेदरम्यान आयुक्तांबाबत सावध भूमिका घेतली.
साठवणे यांना वनवेंची नोटीस
महापौरांना स्थगन प्रस्ताव विषयपत्रिकेत चर्चा करण्याकरिता देण्यात आला आहे . तो परत घेण्यात यावा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपातील विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी काँग्रेसचे नगरसेवक नितीन साठवणे यांना पाठविलेल्या नोटीसमधून दिला आहे.
शिस्तभंग कारवाई कशी करणार?
स्थगन प्रस्ताव मागे न घेतल्यास शिस्तभंग कारवाई करण्याचा इशारा तानाजी वनवे यांनी नितीन साठवणे यांना दिला आहे. परंतु प्रस्ताव काँग्रेस सदस्यांच्याच सहमतीने मांडण्यात आला होता. यावर चर्चा सुरू झाल्याने तो मागे घेत नाही. अशा परिस्थितीत कारवाई कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.