भाजपला हवा तरुणांचा हात, ‘इन्फ्लुएनर्न्स’ची घेणार साथ
By योगेश पांडे | Published: June 12, 2023 12:22 PM2023-06-12T12:22:37+5:302023-06-12T12:26:33+5:30
‘मिशन २०२४’साठी ‘सोशल मीडिया’वर विशेष भर : पक्षाकडून चाचपणी सुरू
योगेश पांडे
नागपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी मतदारसंघनिहाय प्रमुख जाहीर करून भाजपने ‘मिशन २०२४’साठी एका अर्थाने शंखनादच केला आहे. २०२४ चे ‘टार्गेट’ सोपे नसल्याची भाजपच्या नेत्यांना जाणीव आहे. त्यामुळे २०१४ प्रमाणे पुढील निवडणुकांतदेखील तरुण मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात जोडण्यावर भर राहणार आहे. आजच्या तरुणाईला त्यांच्याच ‘स्टाइल’ने साद घालण्यासाठी पक्षाकडून ‘सोशल मीडिया’तील ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ची साथ घेण्यात येण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात विविध पातळ्यांवर चाचपणीदेखील सुरू असून खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नागपूर जिल्ह्यातील काही निवडक ‘इन्फ्ल्युएन्सर्स’शी संवाद साधला.
२०१४ च्या निवडणुकांमध्ये भाजपने तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला होता. २०१९ मध्ये मतदानवाढ व नवमतदारांशी संपर्क यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. अजून २०२४ च्या निवडणुकांना १० महिने शिल्लक आहेत. मात्र भाजपकडून तयारीला सुरुवात झाली आहे. राजकीय पातळीवर भाजपने विधानसभा व लोकसभा मतदारसंघनिहायप्रमुख नेमून नियोजन सुरू केले आहे. तर दुसरीकडे प्रचार-प्रसार धोरणाचीदेखील ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत ‘सोशल मीडिया’वर विशेष लक्ष राहणार असून भाजपाने पक्ष पदाधिकारी व नेत्यांना त्यावर सक्रिय राहण्याचे निर्देशच दिले आहेत. मात्र तरुणाई फेसबुक, ट्विटर यासारख्या ‘प्लॅटफॉर्म्स’पेक्षा ‘इन्स्टाग्राम’सारख्या ‘ॲप्स’वर जास्त सक्रिय असते. anभाजपच्या धुरिणांनी हीच बाब हेरून यासारख्या ‘ॲप्स’वर सक्रिय असणाऱ्या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ची यादी बनविली आहे. सद्यस्थितीत कुठल्याही ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ला अधिकृतपणे प्रचार-प्रसारासाठी संपर्क करण्यात आला नसला तरी कोण नेमका कामी येऊ शकतो याची चाचपणी सुरू आहे, अशी माहिती पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
एका ‘क्लिक’वर लाखो ‘फॉलोअर्स’पर्यंत संदेश
सोशल मीडियावर ‘इन्फ्ल्युएन्सर्स’चे महत्त्व वाढत आहे. पक्षांकडून पारंपरिक प्रचारावर भर देण्यात येतो. अनेक नेते सोशल मीडियावर सक्रियदेखील आहेत. मात्र ‘इन्फ्ल्युएन्सर्स’चे हजारोपासून लाखोंपर्यंत ‘फॉलोअर्स’ असतात. त्यामुळे त्यांनी टाकलेली एक ‘पोस्ट’ एका क्षणात हजारो-लाखो ‘स्मार्टफोन्स’पर्यंत लगेच पोहोचते. तेथून ‘शेअरिंग’च्या माध्यमातून त्याचा आवाका आणखी वाढतो. प्रचाराचे वेगवान साधन, तरुणाईपर्यंत असलेला संपर्क या बाब लक्षात घेऊनच या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’ची चाचपणी सुरू आहे.
उपमुख्यमंत्र्यांनीदेखील साधला संवाद
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: सोशल माध्यमांवर सक्रिय असतात. तीन दिवसांपूर्वी त्यांनी नागपुरात सोशल माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या व हजारो-लाखोंमध्ये फॉलोअर्स असलेल्या ‘इन्फ्ल्युएन्सर्स’शी संवाद साधला. यात अगदी १८ वर्षांच्या तरुणापासून ते वरिष्ठांपर्यंतचा समावेश होता. यावेळी ‘सोशल मीडिया’वरील ‘इन्फ्ल्युएन्सर्स’च्या प्रभावावरदेखील चर्चा झाली. तसेच विकास योजना, तरुणांसाठीची सरकारची भूमिका या गोष्टींवरदेखील ‘इन्फ्ल्युएन्सर्स’समोर भूमिका मांडण्यात आली.