नागपुरात भाजपच्या गडाला धक्का; काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 04:21 AM2020-01-09T04:21:59+5:302020-01-09T04:22:15+5:30
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे.
नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, नागपूरजिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जिल्ह्यातील ५८ जि.प. सर्कलपैकी ४० जागांवर आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. यात कॉँग्रेसला ३० तर राष्ट्रवादीला १० जागांवर विजय मिळाला आहे. भाजपचा रथ मात्र जिल्ह्यात केवळ १५ जागांवर थांबला. इकडे स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेलाही मतदारांनी नाकारले आहे. शिवसेनेला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.
काटोल तालुक्यातील शेकाप आणि उमरेड तालुक्यातील अपक्ष विजयी उमेदवाराने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने, हे संख्याबळ आता ४२ वर पोहोचले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यात कॉँग्रेसचे नितीन राऊत आणि सुनील केदार तर राष्ट्रवादीचे अनिल देशमुख असेतीन कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांना दमदार यश मिळाले आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल तालुक्यात राष्ट्रवादीला दोन, शेकाप (राष्ट्रवादी समर्थित) एका जागेवर विजय मिळवला आहे. नरखेड तालुक्यातील चारही जागावर आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. येथे राष्ट्रवादीला तीन तर काँग्रेसचा एका जागेवर विजय झाला. तर पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघातील सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यात भाजपला खातेही उघडता आले नाही. कळमेश्वर तालुक्यातील तीन आणि सावनेर तालुक्यातील सहाही जागावर काँग्रेसने दमदार विजय मिळविला आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे मूळगाव असलेल्या धापेवाडा जि.प. सर्कलमध्ये भाजपचे २० वर्षांचे वर्चस्व मोडित काढत काँग्रेसने हात उंचावला आहे. यासोबतच राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहत असलेल्या कामठी तालुक्यातील कोराडी सर्कलमध्ये कॉँग्रेसने पुन्हा विजय मिळविला आहे.
>पंचायत समितीत कॉँग्रेस नंबर १
नागपूर जिल्ह्यातील १३ पंचायत समितीच्या ११६ गणात ५९ जागांवर काँग्रेसने ताबा मिळवला आहे. यानंतर भाजप (२४), राष्ट्रवादी (२३), शिवसेना (७) आणि अपक्ष (इतर) ३ जागावर विजय मिळाला आहे.
कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता जिल्ह्यातील १३ ही पंचायत समित्यांवर या दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करता येणार आहे.
>आजी-माजी मंत्री पुत्र जिंकले
काटोल तालुक्यातील मेटपांजरा सर्कलमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र राष्ट्रवादीचे सलील देशमुख मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांनी भाजपचे प्रवीण अडकिने यांचा पराभव केला.
हिंगणा तालुक्यातील रायपूर सर्कलमध्ये माजी मंत्री रमेश बंग यांचे पुत्र राष्ट्रवादीचे दिनेश बंग विजयी झाले. त्यांनी भाजपचे विकास दाभेकर यांचा पराभव केला.
>पक्षीय बलाबल
एकूण
जागा - ५८
कॉँग्रेस - ३०
राष्ट्रवादी कॉँग्रेस- १०
भाजप - १५
शिवसेना - १
शेकाप -१
अपक्ष - १