मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पाठिंबा; चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य
By कमलेश वानखेडे | Published: February 16, 2024 05:16 PM2024-02-16T17:16:49+5:302024-02-16T17:17:35+5:30
ओबीसी आरक्षणाला शून्य टक्केही धक्का लागणार नाही, असा पुनरुच्चाही त्यांनी केला.
कमलेश वानखेडे, नागपूर : राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भातील दिलेल्या अहवालावर विशेष अधिवेशनात चर्चा होईल. मराठा आरक्षणासंदर्भात जो कायदा मुख्यमंत्री आणतील त्याला भाजपाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाला शून्य टक्केही धक्का लागणार नाही, असा पुनरुच्चाही त्यांनी केला.
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे ही आमची भूमिका आहे. देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले होते. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानंतर सरकारने पूर्ण अभ्यास करूनच कायद्याचा मसूदा तयार होईल. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी काढल्या असतील त्या पूर्ण केल्या जातील. मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण हे टिकणार असेल. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याने आता मनोज जरांगे पाटील यांची मागणी पूर्ण होणार असल्याने त्यांनी उपोषण मागे घ्यावे व सरकारच्या भूमिकेचे स्वागत करावे, असेही ते म्हणाले.
आरक्षण हा निवडणुकीचा मुद्दा नाही :
कोणत्याही समाजाचे आरक्षण हा सामाजिक मुद्दा आहे. त्याचा राजकीय फायदा होईलच असे नाही. विविध समाजाच्या मागण्या सरकारला पूर्ण कराव्या लागतात. त्याकडे निवडणुकीच्या दृष्टीने बघू नये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, त्यामध्ये कोणताही दुसरा हेतु नाही.
नाना पटोले यांना बोलण्याचा अधिकार नाही :
नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाबाबत टीका करण्यापेक्षा त्यांचे नेते राहुल गांधी यांना समजावून सांगावे. राहुल गांधी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान करीत आहेत. कॉंग्रेसने ६५ वर्षांत कधीच ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. त्यामुळे त्यांना ओबीसींविषयी बोलण्याचा काहीच अधिकार नाही.