बाबासाहेबांच्या जयंतीच्या नावावर भाजपाची भंपकबाजी
By admin | Published: April 12, 2016 05:17 AM2016-04-12T05:17:26+5:302016-04-12T05:17:26+5:30
भारतीय जनता पार्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती साजरी तर करीत आहे, पण हृदयातून किंवा मनातून
नागपूर : भारतीय जनता पार्टी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती साजरी तर करीत आहे, पण हृदयातून किंवा मनातून नव्हे. भाजपाची ही भंपकबाजी आहे. बाबासाहेबांच्या विचारधारेच्या हे विपरीत आहे, अशी सडकून टीका अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी येथे केली.
काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी सोमवारी दुपारी ४ वाजता दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी दिग्विजय सिंह हे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व हे अनन्यसाधारण आहे. ते एक विचारधारा आहेत आणि याच विचारांवर काँग्रेस पक्षाने देशाला समोर नेले आहे. बाबासाहेबांच्या विचारधारांतर्गत संविधान तयार झाले आहे. याच विचारधारेवर काम करीत पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहनसिंग यांनी एक मजबूत सामाजिक आर्थिक आधारावर देश उभा केला आहे. ही विचारधारा देशासाठी गरजेची आहे. कारण, या विचारधारेमुळे लोक जुळतात. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी कमी होते. परंतु, दुसरीकडे विचारधारा आहे संघाची आणि भाजपाची, जी गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वाढवते. गरिबांच्या वेदनांचा तिरस्कार करते.