नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाची मुसंडी, अनिल देशमुखांच्या मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का
By जितेंद्र ढवळे | Published: December 20, 2022 04:26 PM2022-12-20T16:26:35+5:302022-12-20T16:27:12+5:30
२३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि २१२७ सदस्यांसाठी ९०३ मतदान केंद्रांवर रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात ४,२७,४९४ पैकी ३,२६,१७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.
नागपूर : जिल्ह्यातील २३४ ग्रा.पं.च्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपा समर्थित पॅनेलच्या उमेदवारांनी दमदार विजय संपादीत केला आहे. सावनेर आणि कळमेश्वर तालुक्यात कॉंग्रेस समर्थित पॅनेलच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. येथे आ.सुनील केदार यांच्या नेतृत्वातील पॅनेलवर मतदारांनी विश्वास दाखविला आहे. माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड मतदार संघातील नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे.
२३४ ग्रामपंचायतींचे सरपंच आणि २१२७ सदस्यांसाठी ९०३ मतदान केंद्रांवर रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यात ४,२७,४९४ पैकी ३,२६,१७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील २३७ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, पारशिवनी तालुक्यातील कांद्री ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार असल्याने येथे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली नाही. उर्वरित २३६ पैकी नरखेड तालुक्यातील अंबाडा (देशमुख) आणि नागपूर ग्रामीण तालुक्यातील माहुरझरी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. शिवाय कळमेश्वर तालुक्यातील गौंडखैरी, सावनेर तालुक्यात कुसुंबी आणि भिवापूर तालुक्यात कारगावच्या सरपंचपदाची निवड बिनविरोध झाली आहे.
या गावचे सरपंच बिनविरोध -
- जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील अंबाडा (देशमुख) ग्रा. पं.च्या सरपंचपदी प्रमिला बारई यांची निवड बिनविरोध झाली आहे.
- कळमेश्वर तालुक्यात गोंडखैरी ग्रा.पं.च्या सरपंचपदी गौंडखैरी ग्रामविकास आघाडीच्या वर्षा अतकरी बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
- सावनेर तालुक्यात कुसुंबी ग्रा. पं.च्या सरपंचपदी जयश्री धुर्वे बिनविरोध झाल्या आहेत.
- नागपूर ग्रामीण तालुक्यात माहूरझरीच्या सरपंचपदी काँग्रेसचे गटाचे प्रमोद राऊत यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
- भिवापूर तालुक्यात कारगाव येथे सरपंचपदासाठी एकमेव अर्ज असल्याने सीमा नेवारे यांची बिनविरोध निवड झाली आहे.