निष्क्रिय लोकप्रतिनिधींवर भाजपचा वॉच, बुथनिहाय मतांच्या आधारे होणार मूल्यांकन
By योगेश पांडे | Published: April 9, 2024 12:03 AM2024-04-09T00:03:46+5:302024-04-09T00:03:56+5:30
भाजपचे काही माजी नगरसेवक प्रचारात आऊट ऑफ फोकस : टार्गेट न गाठल्यास मनपातील संधी जाणार
योगेश पांडे
नागपूर : मागील अनेक वर्षांपासून नागपुरात लोकसभा, विधानसभा व मनपा निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व असताना, काही बुथवर भाजपची अक्षरश: धावपळ होत आहे. काही माजी नगरसेवक प्रचाराच्या रणधुमाळीतून दूरच असून, त्यांच्या निष्क्रियतेवरून कार्यकर्त्यांमध्येदेखील नाराजी आहे. अशा लोकप्रतिनिधींवर पक्षाने बारीक नजर ठेवली असून, बुथनिहाय मतांच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महानगरपालिकेच्या निवडणुका २०२२ च्या सुरुवातीलाच होणे अपेक्षित होते, मात्र या निवडणुका लांबल्या व तत्कालीन नगरसेवक माजी झाले. काही लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीच्या वेळीच नागरिकांमध्ये जात होते, मात्र दोन वर्षांपासून काहीच हालचाल न झाल्याने हे लोकप्रतिनिधी आऊट ऑफ रिच झाले. पक्षातर्फे नियमितपणे काही ना काही उपक्रम राबविण्यात येत होते, मात्र हे लोकप्रतिनिधी केवळ चेहरा दाखविण्यापुरते कार्यक्रमात पोहोचायचे व गृहसंपर्क, तसेच इतर उपक्रमांना पाठ दाखवायचे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. ही नाराजी आता पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचली असून, असा लोकप्रतिनिधींवर लक्ष ठेवण्याचे सूत्रच तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या निष्क्रियतेचा अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
-नेत्यांसमोर हजेरी, प्रत्यक्षात गायब
काही निष्क्रिय पदाधिकारी हे मोठ्या नेत्यांसमोर हजेरी लावतात व तसे फोटोदेखील सोशल माध्यमांवर शेअर करतात, मात्र प्रत्यक्ष तळागाळात जाऊन काम करण्याच्या वेळी हे पदाधिकारी गायब असतात. मागील दोन ते अडीच वर्षांपासून काही जणांबाबत असा सातत्याने अनुभव येत आहे. त्यांच्या तक्रारी अगदी प्रदेशाध्यक्षांपर्यंतदेखील गेल्या आहेत. यामुळेच पक्षाने निकालानंतर बुथनिहाय मतदानाचे विश्लेषण करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक बुथवर ५१ टक्क्यांचे टार्गेट देण्यात आले आहे. त्या आधारावर हे मूल्यांकन होईल, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.
काम न करणाऱ्यांना संधी नाही
आम्ही प्रत्येक बुथवरून १००-१५० मते वाढविण्याचे टार्गेट पदाधिकाऱ्यांना टार्गेट दिले आहे. प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे, काम न करणाऱ्यांना पुढे संधी मिळणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून आहोत. सोशल माध्यमांवर फोटो टाकणे आणि प्रचाराला पाठ दाखविणे असे प्रकार चालणार नाहीत.
- बंटी कुकडे, महानगराध्यक्ष, भाजप, नागपूर