पायातील रॉडसह उडाला ब्लॅक बिट्रन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 10:48 PM2020-06-06T22:48:38+5:302020-06-06T22:49:52+5:30
मागील २० दिवसांपूर्वी नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेला ब्लॅक बिट्रन हा पक्षी दुरुस्त होत असतानाच शुक्रवारी मोठ्या पिंजऱ्यातून उडून गेला. विशेष म्हणजे त्याच्या तुटलेल्या पायामध्ये रॉड होता. त्याला पिनही लावलेली होती. मात्र पायात बळ येताच तो उडून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील २० दिवसांपूर्वी नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेला ब्लॅक बिट्रन हा पक्षी दुरुस्त होत असतानाच शुक्रवारी मोठ्या पिंजऱ्यातून उडून गेला. विशेष म्हणजे त्याच्या तुटलेल्या पायामध्ये रॉड होता. त्याला पिनही लावलेली होती. मात्र पायात बळ येताच तो उडून गेला.
१४ मे रोजी हा पक्षी पाय तुटलेल्या अवस्थेत ट्रान्झिटमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आला होता. तो गंभीर जखमी होऊन त्याच्या पायाचे मुख्य हाड तुटले होते. त्याच्या पायाचा एक्स-रे घेतल्यावर निदान झाल्याने तेथील डॉक्टरांच्या चमूने या पक्ष्यावर उपचार केले होते. सर्जरी करून पायात रॉडही टाकला होता. बरेच दिवस हा पक्षी आयसीयूमध्ये होता, हळूहळू पायावर भार देऊन तो चालायला लागला. जिवंत टाकलेले मासेही खायचा. त्याला थोडी मोठी जागा द्यायची असल्याने चालण्यासाठी आणि उडण्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला ३ जूनला मोठ्या जाळीच्या पिंजºयामध्ये ठेवण्यात आले होते. ४ तारखेला तो रात्री उडून भिंतीवर बसला, भिंतीच्या वर जाळी लावलेली आहे, त्या जाळीच्या छोट्या छिद्रातून तो उडून निघून गेला.
या घटनेसंदर्भात मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते म्हणाले, तसेही त्याला जाळीमधून नंतर खुल्या अधिवासात उडवायचे होतेच. मात्र त्याआधीच तो स्वत:हून उडून गेला. सोबत पायातील रॉड व पिन घेऊन गेला. ते काढायची संधी पक्ष्याने दिली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्याच्या पायातील रॉडमुळे त्या पक्ष्याला फारशी अडचण येणार नाही, असे मत हाते यांनी व्यक्त केले आहे.