काला यानि अंधेरा : तुझे असणे घातक! नसणे व्यापक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:09 PM2020-02-11T23:09:28+5:302020-02-11T23:14:53+5:30

‘तुम आऐ तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला’ पण, तो चंद्र कसा निघाला. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचे तुकडे पडत गेले आणि नाहीसा झाला, शून्य झाला.

Black is dark: dangerous to have you! Extensive to have not! | काला यानि अंधेरा : तुझे असणे घातक! नसणे व्यापक!

काला यानि अंधेरा : तुझे असणे घातक! नसणे व्यापक!

Next
ठळक मुद्देकुणी तरी कलेचे मर्म समजून घ्या हो२१वा भारत रंग महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘तुम आऐ तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला’ पण, तो चंद्र कसा निघाला. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचे तुकडे पडत गेले आणि नाहीसा झाला, शून्य झाला. पुन्हा शून्यातून पूर्णत्वापर्यंतच्या प्रवासात पडलेले तुकडे एक एक जुळत गेले आणि तो चंद्र पूर्ण झाला म्हणून पौर्णिमा... हा चंद्राचा प्रवास म्हणजे कलावंत! तो तिळतिळ तुटतो, जुळतो आणि आपल्या प्रतिभेच्या उजेडात अव्यक्त भावनांना उजागर करतो. त्याची ही उजागरता कुणाला तरी साधन ठरते आणि केवळ स्वार्थापोटी त्याला दडपल्या जाते. हाच गाभा ‘काला यानि अंधेरा’ या हिंदीनाटकातून व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने प्रथमच नागपुरात २१व्या भारत रंग महोत्सवाचा समांतर नाट्यमहोत्सव साई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्याच महोत्सवात मंगळवारी गुजरातच्या अहमदाबाद येथील इंडी प्रॉडक्शन्सतर्फे परेश व्यास लिखित व कबीर ठाकोर दिग्दर्शित ‘काला यानि अंधेरा’ हे हिंदीनाटक सादर झाले. महोत्सवाचे समन्वयक डॉ. विनोद इंदूरकर व ज्येष्ठ रंगकर्मी अनिल चनाखेकर यांच्या हस्ते नाट्यकलावंतांचा सत्कार करण्यात आला.
नाटकाची कथा विनय सुभाष केलकर रंगसंगतीलाच जीवन मानणाऱ्या चित्रकार प्राध्यापकाच्या कलाभावनेच्या अनुषंगाने गुंफण्यात आली आहे. प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन यांच्या चित्रावरून उडालेला गदारोळ आणि २००७मध्ये अहमदाबादमधील चित्रकला महाविद्यालयात चित्रकलेच्या प्राध्यापकाच्या खुनाचा संदर्भातून या कथेचे कथासूत्र मांडण्यात आले आहे. कला ही जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि कलावंत रंगरेषाच्या माध्यमातून स्वत:ची कला आविष्कृत करतो. रंगाचा प्रत्येक थेंब आणि पेन्सिलीने कोरलेली प्रत्येक रेषा, त्याच्या भावनेचे तार असतात.
त्यात श्लील-अश्लील असे काही नसते. भावनेचे राजकारण होते, ही बाब कलेच्या प्रांतात बुडालेल्या कलावंताला ठाऊक नाही आणि राजकारणी कशा तऱ्हेने त्याचा उपहास करतात हाच भाव या नाट्यकृतीतून सादर होतो. कृष्णन हा केलकर यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रकलेल्या प्रांतात उडी घेण्यास आसुसलेला विद्यार्थी तर त्याचाच मित्र असलेला राजू शाह याला कलेचे मोल नाही. मात्र, अंतिम सादरीकरणाची वेळ आली आहे आणि त्यात तो मागे पडतो. त्यामुळे केलकर त्याचा टोचून बोलतात आणि काळा रंग भेट देऊन मोकळे होतात. हा अपमान समजून राजू अनावधनाने राजकीय व्यक्तीला सांगून अपमानाचा बदला घेतो. मात्र, त्याच वेळी झालेला कलेचा अपमान राजूच्याही जिव्हारी लागतो आणि या घटनेमुळे कलेचा महर्षी व महर्षी होण्याच्या वाटेवर असलेल्या दोन व्यक्ती अज्ञातवासात जातात. या दोघांचा शोध आणि सामाजिक वास्तवाचे संदर्भ यातून फुलले आहे. नाटकाची गती, संवाद लेखन आणि अभिनेत्यांची अदायगी अप्रतिम असल्याने, प्रत्येक फॉर्मेशन्स आणि संवादाला टाळ्यांचा गडगडाट होत होता, हेच या नाटकाचे यश म्हणावे लागेल. नाटकात विशाल शाह, शिवम पारेख, कबिर ठाकरे, दीप पटेल, पुजा पुरोहित, कैलाश शहदादपुरी, प्रशांत जांगीड, निलय गोराडिया, तुषार शर्मा, सुरज नायक, जीत पटेल, श्रुहद गोस्वामी, राधिक बुधभट्टी, अनिकेत परमार, यश वरण, नेहा शाह, आदित्य त्रिवेदी व परेश व्यास यांच्या भूमिका होत्या. संगीत सूरज नायक व सौरभ जोशी, प्रकाशयोजना जीत पटेल व भव्य दोषी यांचे होते.

 

Web Title: Black is dark: dangerous to have you! Extensive to have not!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.