वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी पाळणार काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:49 PM2019-04-29T23:49:28+5:302019-04-29T23:50:29+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनकर्ते काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिनाचा निषेध करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनकर्ते काळ्या फिती लावून महाराष्ट्र दिनाचा निषेध करणार आहेत.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची बैठक नुकतीच आमदार निवास सभागृहात पार पडली. बैठकीत १ मे महाराष्ट्र दिनी धरणे आंदोलन करून काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. बैठकीला विदर्भ आंदोलनाचे नेते अॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष रंजना मामर्डे, प्रबीरकुमार चक्रवर्ती, प्रा. पुुरुषोत्तम पाटील, सुनील वडस्कर, मुकेश मासूरकर, विजया धोटे, अरुण केदार उपस्थित होते. बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने लोकसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवारांबाबत आढावा घेण्यात आला. सत्तारूढ भाजपाने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याबाबत दिलेले आश्वासन आणि विदर्भवाद्यांची केलेली फसवणूक यावर चर्चा करण्यात आली. पाच महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होत असून, सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. विदर्भ राज्याला विरोध करणाऱ्या पक्षाला विधानसभा
निवडणुकीतून हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत पूर्व यवतमाळ जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी विजया आगबत्तलवार, रुपाली सोमकुवर यांची पूर्व नागपूर शहर युवती आघाडी अध्यक्ष, तर रजनी शुक्ला यांची पश्चिम नागपूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अमरावती जिल्हा उपाध्यक्षपदी माधव गावंडे, सुनील साबळे यांची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला मोरेश्वर टेंभुर्डे, विष्णू आष्टीकर, राजेंद्र आगरकर, दिलीप भोयर, देविदास लांजेवार, राजेंद्रसिंग ठाकूर, जगदीश बद्रे, कृष्णराव भोंगाडे, किशोर पातनवार, कपिल इद्दे, मितीन भागवत, पौर्णिमा भिलावे, संतोष खोडे, वृषभ वानखेडे, दिलीप हगवणे, रविना शामकुळे उपस्थित होते.