नागपुरात तंत्रपूजेने लावला ११ लाखांचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:17 PM2017-11-09T12:17:34+5:302017-11-09T12:20:35+5:30

तंत्रपूजेने ११ लाख रुपयाचे ११ कोटी रुपये बनवून देण्याचे आमिष दाखवून एका प्रॉपर्टी डीलरला ११ लाखाचा चुना लावण्यात आला.

Black magic and loss of 11 lacs in Nagpur | नागपुरात तंत्रपूजेने लावला ११ लाखांचा चुना

नागपुरात तंत्रपूजेने लावला ११ लाखांचा चुना

Next
ठळक मुद्दे११ कोटी बनवून देण्याचे आमिष प्रॉपर्टी डीलरला गंडा

आॅनलाईन लोकमत
नागपूर : तंत्रपूजेने ११ लाख रुपयाचे ११ कोटी रुपये बनवून देण्याचे आमिष दाखवून एका प्रॉपर्टी डीलरला ११ लाखाचा चुना लावण्यात आला. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत दिघोरी नाक्याजवळ मंगळवारी घडली. विनोद अशोक बोंदरे (३८) रा. टेलिफोननगर असे फिर्यादीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार विनोद हा प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतो. त्याला काही दिवसांपूर्वी त्याचा मित्र रामराव रंदई याने त्याच्या ओळखीचा यवतमाळ येथील रामभाऊ सालंखे याची एका गुरुजीसोबत ओळख असल्याचे सांगितले. तो गुरुजी ११ लाख रुपये पूजेत ठेवल्यावर ११ कोटी रुपये करून देत असल्याचे सांगितले. विनोदला पैशाची गरज होती. तो रामरावने सांगितल्यानुसार कथित गुरुजीला बोलावण्यास तयार झाला. रामरावने गुरुजीला बोलावून घेतले. ७ नोव्हेंबरला गुरुजी तवेरा गाडीने नागपूरला आला. त्याच्यासोबत सात जण होते. त्यात रामभाऊ सालंखे, दिवाकर रेड्डी, अमर वालदे आदींचा सहभाग होता. विनोदने बहादुरा येथील बँकेतून ११ लाख रुपये काढले. रुपये काढल्यावर विनोदने रामरावने सांगितल्यानुसार पूजेच्या साहित्यासाठी पाच हजार रुपये दिले. पूजेचे साहित्य खरेदी करून आल्यावर सर्वजण विनोदचा मित्र राहुल दहीकर याच्या दिघोरी नाका येथील कार्यालयात आले. तिथे रामराव, गुरुजी, अमर वालदे आणि इतर लोक उपस्थित होते. रामराव व गुरुजीने पूजेला सुरुवात केली. यादरम्यान विनोदला त्याच्याजवळचे ११ लाख रुपये पूजेत ठेवण्यात सांगण्यात आले. विनोदने रुपये ठेवले. विनोद व गुरुजीसोबत आलेल्या इतर पाच जण कार्यालयातील बाहेरच्या खोलीत पूजा संपण्याची वाट पाहत बसले. खूप वेळानंतर गुरुजी व त्याचा एक साथीदार तेथून निघून गेले.
काही वेळानंतर रामरावने ‘इथली पूजा संपली आहे. आता स्मशान घाटात जाऊन पूजा करायची आहे’, असे विनोदला सांगत ११ लाख रुपये उचलून घेतले. ते रुपये एका बॅगेत ठेवले. रात्री ११ वाजता रामराव व गुरुजी बाईकने नोटांची बँग घेऊन रवाना झाले. सूर्योदय इंजिनियरिंग कॉलेजजवळ रामरावने गुरुजीला उतरविले.
रामराव एकटाच राहुल देवीकर याच्या कार्यालयात परत आला. त्याला एकटा पाहून विनोदला संशय आला. त्याने पूजेच्या ठिकाणी जाऊन पाहिले तेव्हा तिथे ११ लाख रुपये गायब होते. विनोद मित्रासोबत गुरुजी व त्याच्या साथीदारांना शोधण्यासाठी निघाला. तो सूर्योदय इंजिनियरिंग कॉलेजजवळ आला. त्यांना येताना पाहून गुरुजी आपल्या साथीदारासह कारमध्ये बसून फरार झाला. विनोदने कारचा पाठलाग केला. परंतु तोपर्यंत ते खूप दूर निघून गेले होते. यानंतर विनोदला आपण फसविले गेल्याचे लक्षात आले. त्याने पोलिसांना सूचना दिली.
सुरुवातीला सामाजिक प्रतिष्ठेमुळे विनोदने कारमधील आरोपींनी त्याला बंदुकीच्या धाकावर लुटल्याचे सांगितले. ११ लाख रुपये लुटल्याच्या घटनेमुळे पोलिसही हादरून गेले होते.
डीसीपी एस. चैतन्य घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना त्याच्या बोलण्यावर संशय आला. त्यांनी विनोदला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा विनोदने खरा प्रकार सांगितला. परंतु तोपर्यंत आरोपी नागपूर जिल्ह्यातून पसार झाले होते. पोलिसांनी बुधवारी आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे धाड टाकून काही लोकांना ताब्यात घेतले आहे. हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


आठवडाभरातील दुसरी घटना
तंत्रपूजा किंवा जादूटोणामुळे फसवणूक केल्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. सदर येथे एका पशुप्रेमी महिलेला सव्वातीन लाखाने फसवण्यात आले होते. या घटनेतही सूत्रधारासह पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारच्या घटना सर्रास घडत आहेत. परंतु सामाजिक प्रतिष्ठेमुळे पीडित तक्रार दाखल करण्यासाठी मागे-पुढे पाहतात. त्यामुळे गुन्हेगारांचे चांगले फावते. विनोद तक्रार करणार नाही, याची आरोपींना खात्री होती.

Web Title: Black magic and loss of 11 lacs in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा