जादूटोण्यातून पुत्रप्राप्तीचा दावा : ढोंगीबाबाने उकळले सात लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 09:34 PM2019-01-29T21:34:15+5:302019-01-29T21:49:16+5:30

अपत्य सुखासाठी आसुसलेल्या विवाहितेला तंत्रमंत्राच्या साह्याने पुत्रप्राप्ती करून देतो, असे आमिष दाखविणाऱ्या आणि दोन वर्षांपासून तिला गंडेदोरे देऊन तिच्याकडून सात लाख रुपये हडपणाऱ्या टिल्लूबाबा नामक मांत्रिक तसेच त्याच्या महिला साथीदाराला पाचपावली पोलिसांनी अटक केली. मुकेश ऊर्फ बाबा टिल्लू डागोर (वय ६०) असे मांत्रिकाचे नाव असून, तो रामनगर पांढराबोडीत राहतो तर, त्याची साथ देणाऱ्या महिलेचे नाव रजनी माहुले (वय ३५) आहे. ती बुद्धनगर पार्कजवळ राहते.

Black magic, son born claimed : Dhongi Baba cheated by seven lakhs | जादूटोण्यातून पुत्रप्राप्तीचा दावा : ढोंगीबाबाने उकळले सात लाख

जादूटोण्यातून पुत्रप्राप्तीचा दावा : ढोंगीबाबाने उकळले सात लाख

Next
ठळक मुद्देपूजेच्या नावाखाली अंगारेधुपारे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपत्य सुखासाठी आसुसलेल्या विवाहितेला तंत्रमंत्राच्या साह्याने पुत्रप्राप्ती करून देतो, असे आमिष दाखविणाऱ्या आणि दोन वर्षांपासून तिला गंडेदोरे देऊन तिच्याकडून सात लाख रुपये हडपणाऱ्या टिल्लूबाबा नामक मांत्रिक तसेच त्याच्या महिला साथीदाराला पाचपावली पोलिसांनी अटक केली. मुकेश ऊर्फ बाबा टिल्लू डागोर (वय ६०) असे मांत्रिकाचे नाव असून, तो रामनगर पांढराबोडीत राहतो तर, त्याची साथ देणाऱ्या महिलेचे नाव रजनी माहुले (वय ३५) आहे. ती बुद्धनगर पार्कजवळ राहते.
पीडित महिला ३२ वर्षांची आहे. सात वर्षांपूर्वी तिचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पतीपासून तिला मूलबाळ झाले नाही. २०१२ मध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर ती सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला असलेल्या एका व्यक्तीच्या संपर्कात आली. त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यामुळे २०१३ मध्ये या दोघांनी लग्न केले. त्यानंतर तीन वर्षे होऊनही महिलेला मूलबाळ झाले नाही. तिने आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि उपचारही करून घेतले, मात्र फायदा झाला नाही. अशात दोन वर्षांपूर्वी तिच्या शेजारी राहणारी रजनी माहुले तिच्याशी सलगी साधू लागली. रामनगरातील एक बाबा खूप पोहचलेला आहे. त्याच्या औषध आणि तंत्रमंत्रामुळे अनेकांना संतती झाल्याचे रजनीने महिला व तिच्या पतीला सांगितले. एवढेच नव्हे तर मुकेशबाबाकडे चलण्यासाठी आग्रह धरला. तिच्या सांगण्यावरून अपत्यसुखासाठी आसुसलेल्या दाम्पत्याने डिसेंबर २०१६ मध्ये मुकेशबाबाचा दरबार गाठला. अंगात आल्याचे ढोंग करणाऱ्या
मुकेशबाबाने पीडित दाम्पत्याला आशीर्वाद देऊन तुम्हाला मूल होईल, मात्र त्यासाठी औषधांसोबतच मोठी पूजा करावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी लाखोंचा खर्च येऊ शकतो, असेही म्हटले. अपत्यसुखासाठी आसुसलेली महिला पूजेसाठी आणि येणारा खर्च देण्यासाठीही तयार झाली.
एका पूजेचा खर्च ५० हजार
पूजेच्या नावाखाली मुकेशबाबाने दोन वर्षांपासून तंत्रमंत्र,अंगारेधुपारे सुरू केले. कधी स्वत:च्या घरी (दरबारात) तर कधी महिलेच्या घरात पूजा केली. प्रत्येक वेळी पूजेचा खर्च ४० ते ५० हजार येत होता. तो महिलेला गंडेदोरे अन् औषधाच्या नावाखाली वेगवेगळी भुकटीही खायला देत होता. दोन वर्षे झाले, मात्र महिलेला मूलबाळ झाले नाही.
त्यामुळे रजनी आणि मुकेशबाबाचा भंपकपणा महिला आणि तिच्या पतीच्या लक्षात आला. फसवणूक करून दोन वर्षांत सात लाख रुपये हडपणाऱ्या मुकेशबाबाला रजनीच्या माध्यमातून पीडित महिलेने आपली रक्कम परत मागितली. आरोपींनी महिलेला खोटा दिलासा देऊन गप्प केले.
तगादा लावताच छूमंतरची भीती
पैशासाठी तगादा लावणाऱ्या महिलेसोबत प्रारंभी समजुतीचा सूर आळवणाऱ्या रजनी आणि मुकेशबाबाने नंतर त्यांना तंत्रमंत्राच्या माध्यमातून धोका पोहचविण्याची भीती दाखविली. तुला आणि तुझ्या पतीला मंत्रांच्या साह्याने छूमंतर करेन, अशी भीतीही आरोपी दाखवू लागले. परिणामी महिलेने सोमवारी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम २०१३ अन्वये गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली. आरोपी मुकेशबाबाच्या ताब्यातून लिंबू, प्लास्टिक बाहुली आणि जादूटोण्याचे साहित्य जप्त केले.

 

 

Web Title: Black magic, son born claimed : Dhongi Baba cheated by seven lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.