नागपुरात गॅस सिलिंडरच्या काळाबाजारीचा भंडाफोड, ५९ सिलिंडर जप्त
By योगेश पांडे | Published: August 27, 2024 05:11 PM2024-08-27T17:11:21+5:302024-08-27T17:15:28+5:30
गुन्हे शाखेची कारवाई : एका सिलिंडरमधून दुसऱ्यात भरायचा गॅस
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहान मोठ्या गॅस सिलिंडरची काळाबाजारी करणाऱ्या एका रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भंडाफोड केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
प्रितपालसिंग उर्फ प्रित गुरुचरणसिंग बागल (२८, मिनीमातानगर) असे आरोपीचे नाव आहे. तो घरीच घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा साठा करून त्यातील गॅस इतर सिलिंडरमध्ये भरून त्यांची अवैध पद्धतीने विक्री करत होता. पोलिसांना याची माहिती कळताच तेथे सोमवारी सायंकाळनंतर धाड टाकली. तेथे आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. तो मशीनच्या सहाय्याने गॅस एका सिलिंडरमधून दुसऱ्यात भरत होता. या प्रकारामुळे आजुबाजूच्या वस्तीत जिवीतहानीचादेखील धोका होता. त्याच्या ताब्यातुन वेगवेगळया कंपनीचे घरघूती व व्यावसायिक प्रकारचे लहान व मोठे असे एकुण ५९ सिलेंडर, गॅस रिफिलिंग करण्याची मशीन, व चार चाकी वाहन असा ३.११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात कळमना पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल शिरे, राहुल रोटे, राजेंद्र टाकळीकर, अमोल भक्ते, विशाल नागभिडे, सुधीर तिवारी, आशीष पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एजन्सीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार का ?
आरोपी प्रितकडे एचपी व स्थानिक कंपनीचे सिलेंडर्स आढळून आले. सिलिंडर पुरवठा करणाऱ्यांसोबत त्याने हातमिळावणी केली असल्याची शक्यता आहे. काही काळाअगोदर मानेवाडा मार्गावरदेखील अशाच प्रकारची कारवाई झाली होती. सेंट्रल एव्हेन्यूवर काही रेस्टॉरेन्टचालकांना अशाच पद्धतीच्या रॅकेटच्या माध्यमातून अवैधपणे व्यावसायिक सिलिंडर पुरविण्यात येत होते. या प्रकरणात प्रितला कुठल्या गॅस एजन्सीकडून इतके सारे सिलिंडर्स मिळाले व कुणाली त्याची लिंक आहे याची चौकशी होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.