भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार; ५०० चे तिकीट २५०० तर २००० चे ५ हजारांना
By योगेश पांडे | Published: September 22, 2022 11:23 AM2022-09-22T11:23:59+5:302022-09-22T11:24:10+5:30
‘सोशल’ माध्यमांमधून अव्वाच्या सव्वा रकमेत तिकिटांचा ‘जुगाड’
नागपूर : शुक्रवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी सामन्यासाठी नागपुरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘ऑनलाईन’ तिकीटविक्रीत निराशा हाती लागल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत सामना मैदानावरच पाहायचा असा चंग बांधलेले क्रिकेट चाहते ‘ब्लॅकमार्केट’मध्ये तिकीटांचा ‘जुगाड’ शोधत आहेत. ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारपर्यंत ५०० रुपयांचे तिकीट अडीच हजारांना तर दोन हजारांचे तिकीट पाच- साडेपाच हजारांहून अधिक किमतीला विकले जात होते. विशेष म्हणजे, काळाबाजार करणारे ‘सोशल’ माध्यमांवर ‘टार्गेट’ शोधत आहेत.
‘लोकमत’च्या प्रतिनिधीने काही सूत्रांच्या माध्यमातून सामन्याची तिकीटे मिळतील का, याचा आढावा घेतला. काळाबाजार करणाऱ्यांनी तिकीट विक्रीसाठी सोशल माध्यमांचा आधार घेतला आहे. ‘व्हॉट्सअप’वर एकाशी संपर्क झाला असता त्याने नॉर्थ स्टॅंडचे तिसऱ्या मजल्यावरील दोन हजारांचे तिकीट पाच हजारांना विकण्याची तयारी दाखविली. रक्कम जास्त असल्याचे म्हटल्यावर त्यानेच चार हजार ८०० रुपयांत खरेदी केल्याचा दावा केला.
ट्वीटर, फेसबुकवर अनेकांकडून विचारणा
काळाबाजार करणाऱ्यांकडून व्हीसीएच्या परिसरात थेट येण्याऐवजी ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिकीटांबाबत विचारणा करण्यात येत आहे. काही कारणाने सामन्याला जाता येणार नाही, कमी दरात तिकीट विकायचे आहे, असे सांगत ते लोकांना मॅसेंजरमध्ये बोलण्यास सांगत आहेत. समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेऊन मगच तिकीटाचे अव्वाच्या सव्वा दर सांगण्यात येतात. पोलिसांचा वॉच असल्याने ‘ब्लॅक मार्केटिंग’ करणारे सावध पवित्रा घेऊन संवाद साधत आहेत. तिकीटासाठी इच्छुक असलेले अनेक जण सामन्याच्या ‘हॅशटॅग’च्या मदतीने ‘जुगाड’ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘टेलिग्राम’वरदेखील दुपटीहून अधिक दरात तिकीट
‘टेलिग्राम’ या ‘ॲप’वर भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबाबत चॅनेल्स तयार करण्यात आले आहेत. तेथे तर दुपटीहून अधिक दरात तिकीट विक्री सुरू आहे. संबंधित व्यक्तीने बुधवारी सायंकाळी केवळ पाच तिकीट उपलब्ध असल्याचे सांगितले व त्याचा सुरुवातीचा दरच सहा हजारांहून अधिक होता.
एक व्यक्तीकडे २६ तिकीटे, पोलिसांचा ‘वॉच’ कुठे ?
‘टेलिग्राम’च्या एका चॅनेलवर १९ सप्टेंबर रोजी कुठल्या स्टॅंडची किती तिकीटे उपलब्ध आहेत याची यादीच टाकण्यात आली होती. एकाच व्यक्तीकडे एकूण १२ स्टॅंडची २६ तिकीटे होती. जर ‘पेटीएम इन्सायडर’वर तिकीट विक्रीदरम्यान मर्यादित तिकीटे देण्यात येत होती तर एका व्यक्तीकडे इतकी तिकीटे कुठून आली, असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांचा सोशल माध्यमांवरील ‘वॉच’चा दावा पोकळ ठरल्याचेदेखील दिसून येत आहे.
‘एक्सचेंज’मध्येदेखील ‘दाम करी काम’
अनेक जणांना ‘ऑनलाइन’ तिकीटविक्रीदरम्यान त्यांना हवे असलेले तिकीट मिळाले नाही. त्यामुळे जे मिळाले ते तिकीट विकत घेतले. त्यानंतर ते तिकीट दुसऱ्या स्टॅंडच्या तिकीटासोबत ‘एक्सचेंज’ करण्यासाठीदेखील अनेकांकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठीदेखील अधिक दर आकारण्यात येत आहे.
‘व्हीसीए’त आत ओळख असल्याचा दावा
ऑनलाइन तिकीट बुक केल्यानंतर त्याची प्रिंटआऊट कॉपी घेण्यासाठी व्हीसीएच्या सदर येथील मैदानाजवळ गर्दी झाली होती. ऑनलाइन बुकींग केलेल्या ज्या लोकांना रांगेत लागायचे नसेल व ज्यांना थेट ही प्रत हवी असेल त्यांनी थेट संपर्क करण्यास ‘इंडिया व्हर्सेस ऑस्ट्रेलिया सेकंड टी-ट्वेंटी नागपूर तिकीट्स’ या टेलिग्राम चॅनलवर सांगण्यात आले. व्हीसीएच्या आतमधील व्यक्ती आपल्याच परिचयाची असल्याचा दावा त्याने त्यात केला आहे.