‘मिड-डे मिल’ धान्याच्या काळ्या बाजाराचा भंडाफोड; लाखोंचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 03:22 PM2022-10-13T15:22:54+5:302022-10-13T15:28:52+5:30
झोन तीनच्या पथकाची कारवाई
नागपूर : तहसील व शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धान्याच्या काळाबाजाराचा भंडाफोड करण्यात आला. या कारवाईत जप्त करण्यात आलेला तांदूळ हा माध्यान्ह भोजन मोहिमेचा होता. झोन तीनच्या पथकाने ही कारवाई केली व धान्य तस्करांची वाहने पकडली.
विशेष पथकाने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरकारी धान्याची तीन वाहने संशयावरून तपासणीसाठी अडवली. वाहनात दोन टन तांदूळ आणि एक टन गहू होता व हा माल सरकारी असल्याची बाब समोर आली. गोलू ऊर्फ मोहन दशरथ पराते (वय २६), आबिद हमीद हुसेन (२१) हे वाहनासह उपस्थित होते. पोलिसांनी चालक किशोर सहारे, इरफान वजीर शेख आणि राकेश वर्मा यांना विचारपूस केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. तसेच तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वाहनात दोन टन तांदूळ सापडला. तसेच एका गोदामावर छापा टाकून दोन टन तांदूळ जप्त करण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात चंद्रशेखर भिसीकर, अमोल भिसीकर, मोनू पठाण, सोनू पठाण, सतीश निर्मळकर, हिमांशू अग्निहोत्री आणि जय अग्निहोत्री यांचा पोलीस शोध घेत आहेत. हा तांदूळ ‘मिड डे मिल’ योजनेचा होता असे आढळून आले आहे. झोन तीनचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली.