रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; आरपीएफकडून ठिकठिकाणी छापेमारी
By नरेश डोंगरे | Published: May 13, 2023 06:35 PM2023-05-13T18:35:32+5:302023-05-13T18:36:13+5:30
Nagpur News रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) छडा लावला आहे. या संबंधाने येथील विमानतळावर असलेल्या रेल्वे तिकीट बुकिंगच्या काउंटरसह ठिकठिकाणी छापेमारी करुन झाडाझडती घेतल्याची माहिती आहे.
नरेश डोंगरे
नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) छडा लावला आहे. या संबंधाने येथील विमानतळावर असलेल्या रेल्वे तिकीट बुकिंगच्या काउंटरसह ठिकठिकाणी छापेमारी करुन झाडाझडती घेतल्याची माहिती आहे.
रेल्वेतील काही कर्मचारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहरातील दलाल रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करतात. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना रेल्वेचे सहजासहजी रिझर्वेशन मिळत नाही. सामान्य व्यक्तींना वेटिंग लिस्ट मध्ये दूरवरचा नंबर दाखवला जातो. दुसरीकडे एजंट कडे गेल्यास त्याच रेल्वेचे गाडीचे रिझर्वेशन सहजपणे उपलब्ध होते. त्यासाठी तो दलाल प्रत्येक तिकिटामागे संबंधित व्यक्तीकडून पाचशे रुपये घेतो. अशा प्रकारे रोज मोठ्या प्रमाणावर तिकिटांची हेरफेर करून रिझर्वेशनच्या गोरख धंद्यातून दलाल दर दिवशी लाखोंची कमाई करतात. ही रक्कम भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू आहे. त्याची कुणकुण लागल्यामुळे आरपीएफने ठिकठिकाणीच्या रेल्वे तिकीट काउंटरवर छापा मारून तपासणी सुरू केली. या संबंधाने रेल्वेच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र त्यांनी याबाबत अधिकृत माहिती देण्याचे टाळले.
लोकमतने केला होता पर्दाफाश
विशेष म्हणजे, रेल्वे तिकटांचा बिनबोभाट काळाबाजार सुरू असल्याचे वृत्त लोकमतने काही दिवसांपूर्वी प्रकाशित करून संबंधित तपास यंत्रणांचे या गोरख धंद्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हापासूनच संबंधित तपास यंत्रणा दलालांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून होते.